आर्थिक उन्नतीसाठी शेतीपूरक उद्योगात पशू व दुग्ध व्यवसायाला चालना महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:11+5:302021-02-27T04:24:11+5:30
नांदेड- जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा ...
नांदेड- जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशू स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामग्रीसह एक पशू चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशू चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, आ.अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.श्यामसुंदर शिंदे, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, पदमा सतपलवार,बाळासाहेब रावणगावकर, संजय बेळगे, रामराव नाईक, सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर,हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, डॉ. शरद कुलकर्णी, दिलीप पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव नागेलीकर, सुरेशराव अंबुलगेकर यांची उपस्थिती होती.
इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या व क्षेत्रफळ अधिक आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपण जिल्ह्याच्या विकासासाठी ३५५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात आदिवासी विकास विभागामार्फत वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून साकारणाऱ्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचल्यास खऱ्या गरजूपर्यंत पोहचता येईल असे चव्हाण म्हणाले.