कंधार तालुक्यात पशुगणना लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:06 AM2019-04-09T00:06:21+5:302019-04-09T00:07:06+5:30
२० व्या पशुगणनेला २०१९ मध्ये मुहूर्त लागला खरा; पण मुदतवाढ मिळाल्याने व काही गावांची गणना प्रक्रिया चालू असल्याने आकडेवारी मिळण्यास अवधी आहे.
कंधार : २० व्या पशुगणनेला २०१९ मध्ये मुहूर्त लागला खरा; पण मुदतवाढ मिळाल्याने व काही गावांची गणना प्रक्रिया चालू असल्याने आकडेवारी मिळण्यास अवधी आहे. त्यातच प्रसिद्ध लालकंधारी पशुधनाचे आकलन होण्यास मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दर पाच वर्षाला आॅक्टोबर महिन्यात संदर्भदिनी पशुगणनेला सुरूवात होते. १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यामुळे २० वी पशुगणना २०१७ मध्ये सुरू व्हायला हवी होती. परंतु, पशुगणनेला मुहूर्त सापडत नव्हता. ‘लोकमत’ने तसे वृत २२ मे २०१८ ला प्रसिद्ध केले होते. पशुगणना जानेवारी २०१९ ला सुरु झाली. मागील पशुगणनेत लालकंधारी पशुधनाची संख्या नेमकी किती? याचा उलगडा होत नव्हता. लालकंधारी पशुधनसंख्या उलगडणार असे वृत्त ‘लोकमत’ने २ जानेवारी २०१९ ला प्रसिद्ध केले़ आता होत असलेल्या पशुगणनेत ब्रीडनिहाय पशुगणना होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पशुगणनेसाठी मनुष्यबळाचे दोन प्रशिक्षण झाले. ग्रामीण भागात १२ प्रगणक, शहरात १ प्रगणक आणि २ सुपरवायझर यांनी कंबर कसली. कंधार शहर, पशुवैद्यकीय श्रेणी एकचे व श्रेणी २ चे दवाखान्यातंर्गत असलेल्या १२९ गावांत पशुगणना सुरू झाली. १२९ गावांत २१ जानेवारी रोजी सुरू झाल्याने मार्चअखेर ती पूर्ण करण्याची मुदत होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात नेमकी संख्या समजणार होती. परंतु, १२९ पैकी ७ गावांतील पशुगणना प्रक्रिया प्रगतीपथावर चालू होती. त्यात बारूळ, काटकंळबा, शिराढोण, शिराढोणतांडा, फुलवळ, मंगलसांगवी व मरशिवणी गावाचा समावेश आहे. त्यातच पशुगणनेला एप्रिल अखेरपर्र्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता मे महिन्याची प्रतीक्षा नेमक्या संख्येसाठी करावी लागणार आहे.
यावेळी पशुगणना ही टॅबमधून केली जात आहे. देशी -विदेशी पाळीव प्राण्याची संख्या जातनिहाय समजणार आहे. त्यात देशी, गावरान, भटक्या व संकरित गायी, लालकंधारी प्रसिद्ध पशुधन, म्हैस गावरानसह इतर शेळया, मेंढ्या, भटके श्वान, बदके, ससे, कोंबड्या, घोडे, खेचर, गर्दभ, हत्ती, उंट आदीची आकडेवारी समजणार आहे. पशुगणना झाली तरी तात्काळ आकडेवारी समजणार नाही. कारण टॅबमधून संख्या आॅनलाईन भरली जाणार आहे. ही संख्या जिल्हा ते केंद्र स्तरावर जाईल. नंतर वरिष्ठाकडून पुन्हा तालुकास्तरावर समजणार आहे. त्यामुळे मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुष्काळामुळे पशुधन घटण्याची शक्यता
विशेष म्हणजे, मागील पशुगणनेत लहान पशुधन व मोठे पशुधन मिळून ९१ हजार ७०८ होते. दुष्काळामुळे पाणी, चाराप्रश्न निर्माण झाल्याने पशुधन संगोपन करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे पशुधन संख्या घटण्याची शंका व्यक्त केली जात आहे.परंतु लालकंधारी पशुधन संख्या मात्र समजणार आहे.
पशुगणनेचे काम १२९ पैकी १२२ गावांत झाले आहे. ७ गावांचे काम प्रगतीपथावर आहे. एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. प्रगणक संगणकात फिडींग टँबमधून आॅनलाईन भरत असून सुपरवायझर सेंड करत आहेत. मे महिन्यात पशुधन संख्या समजेल -डॉ.एस.एल. खुने (पशूधन विकास अधिकारी विस्तार पं.स. कंधार)