गावगुंडांच्या विषारी विळख्याने खिळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:33 PM2018-11-25T23:33:05+5:302018-11-25T23:35:57+5:30
गण-गवळण, वगनाट्य, बतावणी अशा लोकनाट्यातून प्रेक्षकांना खळखळून हसवित स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गावगुंडांच्या विषारी विळख्याने नांदेडकरांची मने जिंकली़
नांदेड : गण-गवळण, वगनाट्य, बतावणी अशा लोकनाट्यातून प्रेक्षकांना खळखळून हसवित स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गावगुंडांच्या विषारी विळख्याने नांदेडकरांची मने जिंकली़
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर आठव्या दिवशी रसिक प्रेक्षकांना लोकनाट्य प्रकाराचा आस्वाद घेता आला़ निपॉन सोशल वेलफेअर सोसायटी (बोरी जि. उस्मानाबाद) या संस्थेने सादर केलेल्या पूजा राठोड लिखित, अभय राठोड दिग्दर्शित ‘गावगुंडांचा विषारी विळखा’ या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना खळखळून हसविले़
कसलेही तामझाम नसलेल्या या नाटकाने फक्त आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गण-गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशाप्रकारच्या सादरीकरणातून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला़ त्याचबरोबर समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर नाटकातून आसूड ओढले़ या नाटकाचा आशय आणि नाटकाचे नाव यात कसलेही साम्य दिसून येत नाही.
स्पर्धेची सात वाजताची वेळ असताना तब्बल एक तास उशिराने हे नाटक सुरू झाले़ त्यानंतरही रसिक सभागृहात बसून होते़ नांदेडकर रसिक प्रेक्षकांचे कलावंतांप्रति प्रेम आणि त्यांची रसिकता ख-या अर्थाने यावेळी दिसून आली. त्यांचे हे प्रेम पाहून कलावंतही भारावून गेले.
या लोकनाट्यात विष्णू सूर्यवंशी, विकास माने, बालाजी माने, मनोज महाजन, ईश्वर इंगोले, प्रभाकरराव आगलावे, बाळू कतुरे, तानाजी वाघमारे, सुदर्शन बनसोडे, व्यंकटेश संदले, आकाश इंगोले, अमोल पाटील, अमर काळे, सोनू साखरे, शिवाजी शिंदे या कालावंतांचा समावेश होता. २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने उदय कात्नेश्वरकर लिखित, अनुजा डावरे दिग्दर्शित ‘रात्र माणसाळलेली’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.