नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:23 PM2021-03-22T14:23:36+5:302021-03-22T14:26:28+5:30

नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन राहील. संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मांसविक्रीला घरपोच परवानगी देण्यात आली आहे.

Lockdown in Nanded from March 25 to April 4, important appeal of the Guardian Minister ashok chavan | नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

Next
ठळक मुद्देनागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री पाळावी आणि कोरोनाला दूर ठेवावे, ही विनंती

नांदेड- जिल्ह्यात अंशता लॉकडाऊन करुनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नसल्याने अखेर जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटले आहेत. त्यानंतर, नांदेडचे पालकमंत्रीअशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नागरिकांना आवाहन केलंय. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नांदेडकरांना प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करण्याची सूचना केलीय. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात ११ दिवसांची संचारबंदी लागू होणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री पाळावी आणि कोरोनाला दूर ठेवावे, ही विनंती, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. ३ मार्च रोजी ५९१ रुग्ण आढळल्यानंतर १५ मार्चपासून जिल्ह्यात अंशता लॉकडाऊनचे आदेश काढण्यात आले होते. त्यामध्ये १८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी १७ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, बेकरी, व्यायाम शाळा, जीम, सर्व उद्याने बंद ठेवण्याचे एक आदेशही देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढतच गेली. रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च ९४७ वर पोहचला. त्यामुळे चिंतेत भर पडली. अखेर रविवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. त्यानंतर कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश देण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन राहील. संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मांसविक्रीला घरपोच परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक व खाजगी वाहतूक पूर्णता बंद राहील पण त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी घेतलेली वाहने, वैद्यकीय कारणास्तव प्रवास करता येणार आहे. शासकीय कार्यालयाची वाहने या आदेशातून वगळण्यात आली आहेत. सर्व प्रकारची बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पण त्याचवेळी बांधकामाच्या ठिकाणीच कामगारांची निवास व्यवस्था असल्यास काम करता येणार आहे. लग्न समारंभ, स्वागत समारंभावरही बंदी घालण्यात आली आहे. साामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. खाजगी कार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु मार्च एन्डची कामे कार्यालय बंद ठेवून करण्याची परवानगी दिली आहे. सर्व आंदोलने, उपोषणे यावर निर्बंध घातली आहेत.

सर्व किराणा दुकानाचे ठोक विक्रेते १२ वाजेपर्यंत आपले दुकान सुरू ठेवू शकतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी १२ पर्यंत दुकानातून घरपोच किराणा माल पाठवता येईल. दुध विक्री आणि वितरण सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच करता येईल. फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते १० या वेळेत फिरुन विक्री करता येईल. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा नियमित सुरू राहतील. कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचे कारण सांगून रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसे झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सॉ मीलही बंद ठेवल्या जातील. केवळ स्मशानभूमिच्या बाजूच्या सॉ मील चालू राहतील. जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. डी मार्ट, सुपर मार्केटही बंद राहणार असून ऑनलाईन माध्यमातून १२ वाजेपर्यंत घरपोच साहित्य देता येईल.

या सर्व आदेशाचे पालन करण्यासाठी मनपा व पोलीस विभागाची संयुक्त पथके आणि न.प. हद्दीत न.प. व पोलीस विभागाची पथके तर गाव पातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाची संयुक्त पथके कार्यान्वित करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
 

Web Title: Lockdown in Nanded from March 25 to April 4, important appeal of the Guardian Minister ashok chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.