लॉकडाऊनचा बळी : जगण्यासाठी ६०० कि़मी़ची पायपीट अन् समोर वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 06:35 PM2020-05-15T18:35:45+5:302020-05-15T18:43:31+5:30
मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्याची चिंता राजू बाभूळकर यांना सतावत होती़ त्यांची चिंता कमी व्हावी, यासाठीच पत्नी मुलासह रोजगाराच्या शोधात मुंबईला गेली होती़
हदगाव (जि़नांदेड) : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हाताला काम नाही़ त्यामुळे खायचे काय? या चिंतेत असतानाच मुंबईला रोजीरोटीसाठी गेलेले कुटुंब १५ दिवसांचा तब्बल ६०० कि़मी़ पायी प्रवास करून गावी हदगावात पोहोचले़ घरात असलेल्या मुलीसह स्वत:च्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट असताना आता मुंबईहून आलेल्या आई, पत्नीसह दोन मुलांना सांभाळायचे कसे? या विवंचनेतून राजू मारोती बाभूळकर या ४० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकारामुळे विस्थापित मजुरांचे जीवघेणे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत़
राजू बाभूळकर दोन मुले, दोन मुली, पत्नी आणि आईसह हदगाव येथील वडार गल्लीतील आझाद चौकात राहत होते़ हदगावनजीकच असलेल्या हडसणी येथील एका स्टोन क्रेशरवर दगडफोड करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते़ मात्र, मागच्या वर्षी मोठ्या मुलीचे लग्न झाले़ या लग्नासाठी मायक्रोफायनान्सचे कर्ज त्यांनी घेतले होते़ हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना सतावित होता़ त्यातूनच पत्नी, दोन मुलासह आईला घेऊन राजू यांच्या मोठ्या भावाकडे मुंबईला (कल्याण) रोजगारासाठी गेली़ मयत राजू यांचा मोठा भाऊ शैलेष हा १९९५ पासून कल्याण येथे राहून आपला उदरनिर्वाह चालवित असल्याने कुटुंबातील हे सदस्यही मार्च महिन्यात कल्याणला गेले़ सुदैवाने कल्याणमधील पत्रेफूल येथील केडीएमसीच्या एका कंपनीत त्यांना रोजंदारीवर काम मिळाले़ पुरुषाला ३०० रुपये तर महिलांना २०० रुपये प्रतिदिन हजेरी असल्याने तेथेच टिकून काम करायचा निश्चय या सर्वांनी केला.
कल्याणहून पायी आले गावाकडे
इकडे हदगावमध्ये राजू बाभूळकर आपल्या १८ वर्षीय मनीषा या मुलीसह गावीच राहत होते़ सारे काही सुरळीत होईल अशा अपेक्षा असतानाच अचानक कोरोनाचे संकट उभे राहिले़ लॉकडाऊन वाढत जाऊ लागला, तसे कल्याण येथे काम करणाऱ्या या कुटुंबीयांनी हातातले पैसे संपत आल्याने गावाकडे परतण्याच्या हालचाली सुरू केल्या़ अखेर १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन सुरूच राहिल्याने पत्नी, आई सुमन आणि मोठा मुलगा सचिन (वय २०) आणि लहान मुलगा दशरथ (वय १७) यांच्यासह २९ एप्रिल रोजी कल्याणहून गावाकडे निघाले. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने गावाकडे पायीच परतण्याचा निर्धार या सर्वांनी केला़ त्यांच्यासोबत हदगावचे काही नातेवाईकही होते़ या प्रवासात काही गावांत त्यांच्या खाण्याची सोय झाली, तर कधी उपाशीपोटीच प्रवास करावा लागला़ अखेर १५ दिवसांत ६०० कि़मी़चा पायी प्रवास करून १३ मे रोजी हे सर्व हदगाव येथे पोहोचले़ गावामध्ये येताच प्रशासनाने सर्वांना क्वारंटाईन केले़ पत्नीसह आई आणि मुले हदगावमध्ये आल्याचे राजू बाभूळकर यांना समजले़ लॉकडाऊनमुळे सलग ५० दिवस हाताला काम नसल्याने राजू यांची आबाळ होत होती़ त्यातच आता कल्याणहून आलेल्या या सर्वांना कसे पोसायचे? याची चिंता कुटुंबप्रमुख असलेल्या राजू यांना सतावू लागली़ वडिलांसोबत राहणारी मुलगी मनीषा घराजवळच असलेल्या मामाकडे झोपत असे़ त्यामुळे राजू घरी एकटेच होते़ यातूनच १४ मे रोजी सायंकाळी राजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़
कुटुंबप्रमुखाच्या आत्महत्येमुळे सगळेच हादरले
मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्याची चिंता राजू बाभूळकर यांना सतावत होती़ त्यांची चिंता कमी व्हावी, यासाठीच पत्नी मुलासह रोजगाराच्या शोधात मुंबईला गेली होती़ मात्र, लॉकडाऊनमुळे तेथे मिळालेला रोजगारही हिरावला गेल्याने या कुटुंबीयांनी पुन्हा मूळगावी हदगावला परतण्याचा निर्णय घेतला होता़ सुमारे १५ दिवस ६०० कि़मी़चा पायी प्रवास करून अनेक अडीअडचणीवर मात करीत हे सर्वजण हदगावमध्ये पोहोचले होते़ गावी गेल्यानंतर वडिलांना भेटू आणि पुन्हा गावात राहून रोजीरोटीसाठी प्रयत्न करू अशी या सर्वांची अपेक्षा होती़ मात्र कुटुंब प्रमुख असलेल्या राजू यांनीच आत्महत्या केली़ या घटनेमुळे मुंबईहून परतलेले सर्व कुटुंबीयही हादरले आहेत.