मनाठ्यातील व्यापारी गाळ्याचे कुलूप निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:26 AM2019-03-08T00:26:13+5:302019-03-08T00:26:41+5:30
पंधरा दिवसानंतर ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांत घमासान चर्चा झाल्यानंतर अखेर गुरुवारी मनाठ्यातील व्यापारी गाळ्यांचे कुलूप काढण्यात आले. भाडे दुपट्टीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकजण गाळे सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत.व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता.
हदगाव : पंधरा दिवसानंतर ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांत घमासान चर्चा झाल्यानंतर अखेर गुरुवारी मनाठ्यातील व्यापारी गाळ्यांचे कुलूप काढण्यात आले. भाडे दुपट्टीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकजण गाळे सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत.व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता.
मनाठा ग्रामपंचायतीने बांधलेले गाळे व्यापाऱ्यांना भाड्याने देण्यात आली आहेत. व्यापा-यांकडे मागील ५ ते ६ वर्षांपासूनचे भाडे थकीत होते, वारंवार नोटिसा बजावूनही व्यापारी भाडे भरण्यास तयार नसल्याचे पाहून ग्रामपंचायतने दुरुस्तीच्या नावाखाली व्यापा-यांना गाळे रिकामे करण्यास भाग पाडले. गाळ्यांचे भाडे वाढवावे, मागील थकबाकी भरावी, असा तगादा ग्रामपंचायतने नोटिसीद्वारे लावल्यानंतर व्यापारी हतबल झाले. काही व्यापा-यांची स्थिती अशी आहे की ते ५०० रुपये भाडे देऊ शकत नाहीत़
याविषयी ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर मागील आठवड्यात व्यापा-यांशी चर्चा झाली़ त्यामध्ये सन २०१९ च्या १ मार्चपासून ५०० रुपये भाडे ठरले़ पूर्वी २५० रुपये मासिकभाडे होते़ सहा वर्षाची जी थकबाकी आहे, त्यापैकी अर्धी रक्कम ग्रामपंचायतला जमा करण्यात यावी़, १०० रुपये स्टॅम्प पेपरवर ११ महिन्याचाच गाळेकरार करण्याचे ठरविण्यात आले़ सरपंच दिक्षा नरवाडे, उपसरपंच संगीता पाटील, संभा पाटील, बबन जाधव, सुनील सोनाळे, शंकर पाटील, सुहास शिंदे, ग्रामसेवक सी़पी़ कळणे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली़ पेपरला बातमी सांगू नका असे सांगायलाही ही मंडळी विसरली नाही़ याशिवाय वाढीव भाडे दिले नाही, थकबाकी भरली नाही तर गाळ्यांचा लिलाव करण्याचीही धमकी व्यापा-यांना देण्यात आली.या पार्श्वभूमीवर १० पैकी तीन- चार व्यापा-यांंनी गाळे उघडण्याची समर्थतता दाखविली, इतर पाच जणांनी गाळेबंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
वेळेवर भाडे जमा केला नाही तर गाळे इतर व्यापा-यांना देण्यात येतील. महागाईप्रमाणे मासीक भाडे वाढविण्यात आले. कर वसुलीतूनच ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन करावे लागते- दिशा नरवाडे, सरपंच, मनाठा