Lok Sabha Election 2019 : नांदेडमधील नाराज शिवसैनिकांचा हिंगोलीत तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:40 PM2019-04-04T13:40:15+5:302019-04-04T13:44:10+5:30
नाराज शिवसेना पदाधिकारी नांदेडात प्रचारात सक्रिय न होता हिंगोली मतदारसंघात फिरत आहेत़
- शिवराज बिचेवार
नांदेड : लोकसभा निवडणुकीत भाजपाने आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांची असलेली नाराजी दूर करण्यात अद्यापही सेनेच्या नेत्यांना यश आल नाही. दोन दिवसांपूर्वी नाराजांच्या दिलजमाईसाठी माजी आख़ेडकर यांच्या निवासस्थानी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी बैठकही घेतली़ परंतु, नाराज शिवसेना पदाधिकारी नांदेडात प्रचारात सक्रिय न होता हिंगोली मतदारसंघात फिरत आहेत़ त्यामुळे संपर्कप्रमुखांनी दिलजमाईसाठी चालविलेल्या बाणाचा नेम चुकल्याचे म्हटले जात आहे़
महापालिका निवडणुकीत सेनेचे आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाच्या व्यासपीठावरुन सेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शब्दबाण चालविले होते़ त्यावेळी चिखलीकरांनी सेनेच्या जिल्हाप्रमुखासह अनेकांना फोडत भाजपाच्या तंबूत आणले होते़ चिखलीकरांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांच्या मनावर खोलवर जखम झाली़ त्यात भाजपाने लोकसभेसाठी चिखलीकर यांच्या नावाची घोषणा करताच सेना पदाधिकाऱ्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली़ सेना पदाधिकाऱ्यांनी त्यापूर्वीच उमेदवार घोषित करताना भाजपाने आम्हाला विश्वासात घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता
परंतु या इशाऱ्याकडे भाजपाने कानाडोळा केला़ त्यानंतर शहरप्रमुख पप्पू जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सेना पदाधिकारी चिखलीकरांचा प्रचार करणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला़ त्यानंतर दिलजमाईसाठी दोन दिवसांपूर्वी सेनेचे दिवंगत माजी आ़ प्रकाश खेडकर यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक झाली. यात सेना पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्यासमोर चिखलीकरांच्या प्रतापाचा पाढा वाचला़ परंतु संपर्कप्रमुखांनी मात्र मातोश्रीवरुन आदेश आल्यामुळे एकदिलाने कामाला लागावे लागेल असे आवाहन केले़ या बैठकीला चिखलीकरांचीही उपस्थिती होती़ परंतु, नाराजांनी यामध्ये मध्यममार्ग काढत हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे़
झालं गेलं गंगेला मिळालं -चिखलीकर
महापालिका निवडणुकीत जे झालं गेलं ते गंगेला मिळालं़ त्यावेळी दोन्ही पक्षांची युती नव्हती़ आता युती झाली आहे़ त्यामुळे शिवसैनिक एकदिलाने काम करुन महायुतीचा धर्म पाळतील, असा विश्वास मला आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.