Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये ३४ हजार मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:59 PM2019-04-04T13:59:06+5:302019-04-04T14:01:45+5:30
हे वाढीव मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
- अनुराग पोवळे
नांदेड : नांदेड लोकसभेचा खासदार १७ लाख १७ हजार ८२५ मतदार ठरविणार असून, ३१ जानेवारी २०१९ नंतर झालेल्या नोंदणीत एकूण ३४ हजार ५९६ मतदारांची वाढ होणार आहे. हे वाढीव मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
नांदेड जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या २५ लाख २६ हजार ३०३ इतकी राहणार आहे. हीच मतदारसंख्या ३१ जानेवारी २०१९ अखेर २५ लाख २ हजार ४४ इतकी होती. मतदानाच्या तारखेपर्यंत २५ लाख २६ हजार ३०३ मतदार राहणार आहेत. नांदेड लोकसभेसाठी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. जिल्ह्यातील किनवट आणि हदगाव मतदारसंघातील मतदार हे हिंगोली लोकसभेसाठी तर लोहा विधानसभा मतदारसंघातील २ लाख ७१ हजार ९१७ मतदार लातूर लोकसभेसाठी मतदान करणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत नावनोंदणी करण्यासाठी मतदारांना संधी दिली होती. या संधीचा नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदारांनी पुरेपूर लाभ उचलल्याचे स्पष्ट होत आहे. ३१ जानेवारी २०१९ अखेर नांदेड लोकसभा मतदारसंघात १७ लाख ९११ मतदारांची संख्या होती. ही संख्या १८ एप्रिलपर्यंत १७ लाख १७ हजार ८२५ पर्यंत पोहोचणार आहे.
आज शेवटचा दिवस
नांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार नांदेड उत्तर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ३ लाख ८ हजार ९७ मतदार आहेत. त्या खालोखाल देगलूर मतदारसंघात २ लाख ८९ हजार ९०४ मतदार आहेत. नायगाव मतदारसंघात २ लाख ८२ हजार ८९८, नांदेड दक्षिण मतदारसंघात २ लाख ८१ हजार २३२ आणि भोकर विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ९१४ मतदार आहेत.