Lok Sabha Election 2019 : विद्यार्थी पत्राद्वारे आई-बाबांना करणार मतदान करण्याचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 05:33 PM2019-03-20T17:33:10+5:302019-03-20T17:34:53+5:30
नांदेडमध्ये निवडणूक विभागाचे संकल्पपत्र अभियान
नांदेड : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने व्यापक जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत येत्या मंगळवारपासून शाळांमध्ये संकल्पपत्र अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत विद्यार्थी आपल्या आई-बाबा, दादा, ताईसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांना पत्र लिहून मतदान करण्याची विनंती करीत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या स्वीप मतदार जागृती अभियानातंर्गत मतदानासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून शहरातील नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानास मंगळवारपासून प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन सहायक निवडणूक अधिकारी अनुराधा ढालकरी, लतीफ पठाण, शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, तहसीलदार किरण अंबेकर आदींनी केले आहे.
गोड सल्ला
नांदेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी आपल्या आईबाबा, मामा-मामी, काका-काकी, दादा, ताई इतर नातेवाईकांना तसेच शेजाऱ्यांना येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन पोस्टकार्डद्वारे करणार आहेत. या संकल्पपत्रात मतदानाचे महत्त्व व गरजही हे विद्यार्थी विशद करणार असून, मतदान हे पवित्र कार्य आहे. अगोदर मतदान करा आणि त्यानंतर इतर कामे करा, असा गोड सल्लाही ते देणार आहेत.