Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये तळेगावकरांची बंडखोरी कायम; १४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 05:30 PM2019-03-30T17:30:01+5:302019-03-30T17:30:40+5:30
भाजपचे बंडखोर महेश तळेगावकर यांची उमेदवारी कायम
नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३१ उमेदवारांनी माघार घेतली़ दोन दिवसांत ४१ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता १४ उमेदवार राहिले आहेत़
नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ छाननीत त्यातील चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते़
गुरुवारी दहा उमेदवारांनी माघार घेतली होती़ शुक्रवारी एकूण ३१ उमेदवारांनी माघार घेतली़ त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात नांदेडसाठी आता १४ उमेदवार राहिले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा़यशपाल भिंगे तर समाजवादी पार्टीचे अब्दुल समद, अब्दुल रईस अहेमद, बहुजन मुक्तीचे मोहन वाघमारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनील सोनसळे यांच्यासह श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजित देशमुख, शिवानंद देशमुख अपक्षांचा त्यात समावेश आहे़
पर्याय नव्हता - तळेगावकर
भाजपचे बंडखोर महेश तळेगावकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने पक्षासमोरची चिंता वाढली आहे़ निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे तळेगावकर यांनी सांगितले़