Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:44 PM2019-04-05T14:44:56+5:302019-04-05T14:47:46+5:30

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण, भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे असा सामना आहे़ मतदारसंघात दलित-मुस्लिम मते लक्षवेधी असल्याने या निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़ 

Lok Sabha Election 2019 : Vanchit Bahujan Aaaghadi will be decisive in Nanded | Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

googlenewsNext

- विशाल सोनटक्के 

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे़ १९५१ ते २००४ या कालावधीत झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल १२  निवडणुकांत येथे काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे़, तर केवळ तीन वेळा या मतदारसंघाने काँग्रेस विरोधकांना संधी दिली आहे़ १९७७ मध्ये शेकापच्या तिकीटावर भाई केशव धोंडगे विजयी झाले होते़ त्यानंतर १९८९ मध्ये डॉ़व्यंकटेश  काब्दे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात जनता दलाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती आणि २००४ मध्ये भाजपाच्या वतीने डी़बी़ पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता़ 

नांदेड लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मुस्लिम मते असून सव्वादोन लाख दलित मते आहेत़ तर दीड लाखाच्या आसपास धनगर-हटकर समाजाची मते आहेत़ त्यामुळेच १९८७ मध्ये खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभेची निवडणूक लढविली होती़ त्यावेळी काँग्रेसच्या वतीने लढत असलेल्या अशोक चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ तर प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७१ हजार ९०१ अशी मते मिळाली होती़ त्यानंतर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते हरीभाऊ शेळके यांनी १९९६ च्या निवडणुकीत रिपाइंच्या तिकीटावर १ लाख १९ हजार ६०६ मते खेचली होती़ 

या निवडणुकीत काँगे्रसचे गंगाधरराव कुंटूरकर विजयी झाले होते़ कुंटूरकर यांना २९़४१ टक्के तर रिपाइंच्या वतीने लढलेल्या शेळके यांना १८़९९ टक्के इतकी मते मिळाली होती़ शेळके यांचेच भाच्चे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांना आता वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उतरविले आहे़ आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या सभेलाही नांदेडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याने ही आघाडी किती मते खेचते यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे़

सक्षम प्रचार यंत्रणेचा अभाव 
नांदेड लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. एक भाजपकडे तर दोन मतदारसंघात शिवसेना प्रतिनिधित्व करीत आहे़ मात्र मागील विधानसभा निवडणुकीत नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जागांवर एमआयएमने चुरशीची लढत दिली होती़ त्यामुळेच वंचित आघाडीने यावेळी नांदेडवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते़ काँग्रेस आणि भाजपाच्या तुलनेत आघाडीकडे सक्षम प्रचारयंत्रणा नाही़ त्यामुळेच वंचित आघाडी या निवडणुकीत कुठपर्यंत मजल मारते यावरच मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल़ 

Web Title: Lok Sabha Election 2019 : Vanchit Bahujan Aaaghadi will be decisive in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.