लोकमत इफेक्ट : नांदेडात आगारप्रमुख आणि पेट्रोल पंपचालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:43 PM2019-03-13T18:43:58+5:302019-03-13T18:48:32+5:30
बस स्थानकात होते राजकीय नेत्यांचे बॅनर
नांदेड : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांच्या आत राजकीय जाहिराती करणारे सर्व बॅनर, फलक काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते़ परंतु, नांदेडातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रशासनाला त्याचा विसर पडला होता़ या ठिकाणी शासकीय योजनांच्या जाहिराती करणारे फलक झळकत होते़ या फलकांचे छायाचित्र ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने सकाळीच घटनास्थळाचा पंचनामा करुन आगारप्रमुखावर गुन्हा नोंदविला आहे़ आचारसंहिता भंगाचा नांदेडातील हा पहिला गुन्हा ठरला आहे़
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यंत्रणांची बैठक घेवून आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांच्या आत सर्व खाजगी मालमत्तेवरील पोस्टर्स, बॅनर्स, लेखन, झेंडे काढून घेण्याचे निर्देश दिले होते़ परंतु शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शासकीय योजनांची जाहिरात करणारे व त्यावर नेत्यांची छायाचित्रे, भिंतीवर विविध संघटनांचे राजकीय पक्षाशी संबंधित असलेले बॅनर लावण्यात आले होते़ ‘लोकमत’ ने बसस्थानकात आचारसंहितेचा भंग होत असल्याची बाब छायाचित्राच्या माध्यमातून उघड केली.
त्यानंतर बुधवारी सकाळीच मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश गच्चे हे पथकासह बसस्थानकात धडकले़ पथकाने या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर आणि संघटनांच्या फलकांचे चित्रीकरण केले़ या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यानंतर दुपारी नायगाव-नरसी रस्त्यावर पेट्रोलपंपावर मोदींचे असलेले छायाचित्र न काढल्यामुळे पेट्रोलपंप चालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ नांदेडातील हा आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा ठरला़
काँग्रेसचे निवडणूक विभागाला पत्र
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली असून अजूनही राज्यभरातील एसटी बसेस, बसथांबे, पेट्रोलपंप तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिराती हटविण्यात आल्या नाहीत़ निवडणूक आयोगाने आदेश देवूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही़ याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे़