कागदावरील निधीवरूनच लोणीकरांची आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:40 AM2018-09-09T00:40:16+5:302018-09-09T00:41:01+5:30
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प्रत्यक्षात लोणीकर म्हणतात तेवढा निधीच प्राप्त झालेला नाही़ पाणीपुरवठा योजनांसाठीचा १३५ कोटींचा आराखडा मंजूर आहे़ केवळ या मंजुरीवरुनच लोणीकरांनी आगपाखड केल्याचे आता पुढे आहे़
विशाल सोनटक्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प्रत्यक्षात लोणीकर म्हणतात तेवढा निधीच प्राप्त झालेला नाही़ पाणीपुरवठा योजनांसाठीचा १३५ कोटींचा आराखडा मंजूर आहे़ केवळ या मंजुरीवरुनच लोणीकरांनी आगपाखड केल्याचे आता पुढे आहे़
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये शुक्रवारी ४१ कोटी १७ लक्ष रुपये किमतीच्या १० पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले़ या कार्यक्रमाला आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, आ़ राम पाटील रातोळीकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा आढावा मंत्री महोदयांसमोर सादर केला़ त्यानंतर लोणीकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हातात घेतली़
लग्न झाल्यानंतर वर्षभरात मूल होते, येथे दोन वर्षे उलटूनही पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण होत नसल्याचे सांगत अशा निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान करीत पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे़ मात्र त्यातील अनेक योजना अर्धवट असून काही योजनांनातर सुरुवातही झाली नसल्याचे ते म्हणाले़ सदर कामे रखडल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही पाणी पुरवठामंत्र्यांनी या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले़
दरम्यान, यासंबंधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव म्हणाले की, पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी शुक्रवारी धादांत खोडे विधान केले़ सहा महिन्यांपूर्वी मी स्वत: जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती मिळावी, या योजनांसाठी निधी मिळावा यासाठी मुंबईला मंत्रालयात जावून लोणीकर यांची भेट घेतली होती़ त्यावेळी योजनांसाठी निधी देण्याचे माझी तयारी आहे़ परंतु शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत त्यांनी यासाठी राज्याच्या अर्थ विभागाला जबाबदार धरले होते़ लोणीकर सांगतात त्याप्रमाणे पाणी पुरवठा योजनांसाठीचा कुठलाही निधी दोन वर्षांपासून पडून नाही़
दरम्यान, यासंबंधी वरिष्ठ अधिका-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली़ या वादात आम्हाला ओढू नका असेच या अधिका-यांचे म्हणणे होते़ जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सद्य:स्थितीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ४ कोटी ९९ लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे़ तर केंद्राच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनासाठी ११ कोटी मिळालेले आहेत़ आणि ही सर्व कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे़ पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी ज्या १३५ कोटींच्या निधीचा उल्लेख शुक्रवारच्या कार्यक्रमात केला तो निधी प्रत्यक्षात मिळालेला नसून १३५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास केवळ मंजुरी मिळालेली आहे़ ही परिस्थिती पाहता लोणीकर यांनी केवळ कागदावरील आराखड्यावरुनच आगपाखड केली की प्रत्यक्षात निधीही दिलेला आहे़ याचे उत्तरही तूर्ततरी पाणीपुरवठा विभागाकडील बंद संचिकामध्येच आहे़
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने किती निधी दिला आणि त्यातील किती निधी वापरला याची माहिती घेत आहोत़ मात्र काल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर ज्या भाषेत आणि ज्याप्रकारे बोलले ती पद्धत निषेधार्ह आहे़ पाणीपुरवठामंत्र्यानी मंचावर महिला पदाधिकारी बसलेल्या आहेत़ किमान याचेतरी भान राखायला हवे होते़ अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जावून ते बोलले़ या वाचाळवीरांना पक्षश्रेष्ठींनी थांबविले पाहिजे की यांना पक्षाचेही समर्थ आहे ?
- आ़डी़पी़सावंत
शुक्रवारचा भूमिपूजन सोहळा हा जाहीर कार्यक्रम होता़ आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर जे बोलले ते सर्वांच्या समोर बोलले़ जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने निधी दिलेला आहे़ मात्र त्याचा विनीयोग होत नसेल तर संताप येणारच़ निधी न देता लोणीकर बोलले असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही़ तसे असेल तर कार्यक्रमात मंचावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या एकाही पदाधिकाºयांनी ते खोटे बोलत असल्याचे तेथेच का सांगितले नाही ?
-आ़राम पाटील रातोळीकर
भाजपा सरकार आणि पदाधिकाऱ्यांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे़ पाणीपुरवठा योजनांसाठी निधी द्या म्हणून, मी स्वत: पाठपुरावा केलेला आहे़ मात्र दोन वर्षांत निधी मिळालेला नाही़ केवळ योजनांची नावे बदलण्यात हे सरकार मश्गुल आहे़ शुक्रवारच्या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांनी जे बेताल वक्तव्य केले़ ते लाजीरवाणे आहे़ ही भाषा मंत्र्यांना शोभणारी नाही़ कालच्या वक्तव्यावरुन हा पक्ष किती बेजबाबदार आहे हे दिसून येते़
- समाधान जाधव, जि़प़उपाध्यक्ष