ऑनलाईन खरेदी मालावर करडी नजर
By admin | Published: February 13, 2015 03:08 PM2015-02-13T15:08:01+5:302015-02-13T15:08:01+5:30
नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या.
नांदेड: राज्यात एलबीटी वसुलीचा पॅटर्न निर्माण करणार्या नांदेड महापालिकेने आता ऑनलाईन खरेदीच्या मालावर लक्ष केंद्रीत केले आहे. नविन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसर्याच दिवशी एलबीटी वसुलीसाठी ऑनलाईन खरेदीचा माल जप्त करण्याच्या सूचना स्थानिक संस्था कर विभागाला दिल्या.
त्यानुसार सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्या पथकाला १ कोटी १३ लाख ८९ हजार रूपयांचा माल जानेवारीमध्ये आयात झाल्याचे आढळून आले. या नव्या कारवाईमुळे ऑनलाईन व्यवहार करणार्या व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत. मनपा आयुक्त खोडवेकर यांनी १0 फेब्रुवारी रोजी रूजू झाल्यानंतर स्थानिक संस्था करा संदर्भात सहायक आयुक्त सादेक यांच्याशी चर्चा केली. शहरात ऑनलाईन खरेदीवर आयात होणार्या मालावर (उदा. लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरे आदी मौल्यवान वस्तू) स्थानिक संस्था कर न भरणारे कुरिअर व व्यवसाय करणार्या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित कंपन्यांनी स्थानिक संस्था कराची नोंदणी न करता व स्थानिक संस्था कराचा भरणा न केल्यामुळे दोन्ही दुकानातील माल जप्त करण्यात आला. दोन्ही कंपनीला त्वरीत एलबीटी कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ७ दिवसात कराचा भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी एम. व्ही. सोळंके, शफीक अहेमद, टी. डी. पाटील, वहिदु जमा, गिरीष काठीकर यांनी सहभाग घेतला.
मनपाने मागील तीन महिन्यात एलबीटी थकीत असलेल्या साडेचारशे व्यापार्यांवर कारवाई करण्यात आली. जानेवारी अखेर एलबीटी विभागाने ४६ कोटी ६७ लाख ८१ हजार ४७२ रूपये वसूल केले आहेत. /(प्रतिनिधी)
१ कोटी १३ लाखांचा माल जप्त
स्थानिक संस्था कर विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी डिलेव्हरी कुरिअर व ब्ल्यू डॉट कॉम कुरिअर या दुकानांची तपासणी केली. तेव्हा डिलेव्हरी कुरिअरवर जानेवारी महिन्यात १ कोटी १३ लाख ८९ हजार ३८३ चा माल आयात झालेला आढळून आला.
--------------
जगभरात ऑनलाईनद्वारे मालांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. देशात मुंबई, गुडगाव, ठाणे आदी मोठे शहरे अशा वस्तुंच्या आयात, निर्यातीचे केंद्र आहेत. ग्राहकांना ऑनलाईनद्वारे एखादी वस्तु पाठविल्यानंतर संबंधित शहरात त्या वस्तुचे अधिकृत वितरक असतात. महापालिका हद्दीत वितरक व ग्राहक या दोघांचेही वास्तव्य असते. त्यामुळे संबंधित वितरकाचे प्रतिनिधी घेऊन कुरिअरच्या ठिकाणी या वस्तुंच्या उलाढालीची माहिती घेण्यात येत आहे.औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर नांदेड महापालिकेच्या वतीने ऑनलाईन मालांच्या खरेदी - विक्रीवर अंकुश ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्यवहार किती होतो, याची माहिती मिळेल. ऑनलाईन वस्तुंच्या एलबीटी संदर्भात केंद्र व राज्य शासनाचे ठळक धोरण अद्याप निश्चित झाले नाही. मात्र स्थानिक संस्था कर अधिनियमातंर्गत हा कर बुडविणार्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. - सुशील खोडवेकर, आयुक्त