भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:27 AM2019-06-21T01:27:53+5:302019-06-21T01:29:25+5:30
गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.
नांदेड : गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानासाठी प्रतिमाह जवळपास ८ हजार मेट्रीक टन गहू आवश्यक आहे. आवश्यक असलेला हा गहू प्राप्त झाला असून १५, १६, १७ जून रोजी हा गहू तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला आहे. विशेष पॉलीश नसलेला गहू आणि १६ टक्क्याहून अधिक आर्द्रता असलेला हा गहू लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे.
कृष्णूर धान्य घोटाळ्यापासून संपूर्ण स्वस्त धान्य वितरीत करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या प्रकरणात आता अधिकारीही रडारवर आले आहेत. स्वस्त धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदारही आज तुरुंगात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारे धान्य चांगल्या प्रतिचे आहे की नाही? याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहेत.
पंजाबहून आलेला हा गहू उघड्यावरील असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर गहू भारतीय खाद्यान्न महामंडळामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आला आहे. हा गहू आता तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पोहचविला जात आहे. त्यानंतर तो स्वस्त धान्य दुकानात आणि पुढे तो लाभार्थ्यांना वितरीत केला जातो.
गव्हाची साधारण आर्द्रता ११ टक्के असावी. मात्र केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आलेल्या गव्हामध्ये १६ ते १७ टक्याहून अधिक आर्द्रता आहे. या गव्हाला पॉलीशही नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी गव्हाचे काही वेळातच पिठ करणाºया खापरा किडीचे प्रमाणही अधिक दिसत आहे.
विशेष म्हणजे हा गहू केंद्रीय वखार महामंडळाने स्विकारला असल्याचे त्याचे वितरणही सुरू झाले आहे. गव्हाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरीत करण्यासाठी आलला तांदूळही रिसायकल प्रक्रियेतून आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले बारदानेही जुनेच आहेत. तांदळातील तुकडीचे प्रमाण २९ टक्के ग्राह्य असते. पण जवळपास ४५ टक्के तुकडीचे असलेला तांदुळ केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून वितरीत होत आहे.
केंद्रीय वखार महामंडळात प्राप्त झालेला हा गहू पंजाब येथून आलेला आहे. सदर गव्हाचा दर्जा चांगला आहे. हा गहू तालुकास्तरावर आता वितरीत केला जाणार आहे. भारतीय खाद्यान्न महामंडळाकडून चांगला गहू आला आहे.
- सी.के.दत्ता
व्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, नांदेड