तोट्यातील पॅसेंजर रेल्वे होणार एक्स्प्रेस;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:23 AM2021-08-25T04:23:41+5:302021-08-25T04:23:41+5:30
नांदेड : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. परंतु, ज्या गाड्या तोट्यात धावत आहेत, ...
नांदेड : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. परंतु, ज्या गाड्या तोट्यात धावत आहेत, त्या एक्स्प्रेस करण्याचा निर्णय रेल्वे बाेर्डाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून धावणाऱ्या तीसपैकी तोट्यात धावणाऱ्या आठ गाड्यांचे काय होणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून आजघडीला ७० गाड्या विशेष रेल्वे, एक्स्प्रेसच्या नावाखाली चालविण्यात येत आहेत; परंतु, बोटांवर मोजता येतील एवढ्याच पॅसेंजर सुरू केल्या आहेत. विभागातून कोरोनापूर्वी तब्बल ३० पॅसेंजर गाड्या धावत असत. त्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
तोट्याची कारणे काय?
पॅसेंजर गाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे गर्दी दिसूनही उत्पन्न मिळत नाही.
स्वच्छतेचा अभाव तसेच फेरीवाल्यांचा वाढता त्रास पाहता बहुतांश प्रवासी एक्स्प्रेसला पसंती देतात.
पॅसेंजर गाड्या वेळेवर धावत नाहीत. त्याचा सर्वाधिक फटका उत्पन्नावर होतो.
अधिकृत आदेश नाहीत
जिल्ह्यातून धावणाऱ्या नेमक्या कोणत्या गाड्या एक्स्प्रेस होणार हे सांगणे कठीण आहे. तसेच अद्यापपर्यंत अशा प्रकारचे अधिकृत आदेश विभागीय व्यवस्थापक कार्यालयास प्राप्त न झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील प्रवाशांना पॅसेंजर गाडीच परवडते. त्यात पॅसेंजर गाड्यांना प्रत्येक स्थानकात थांबा असतो. त्यामुळे ग्रामीण व शहराची कनेक्टिव्हिटी होऊ शकते. त्या पॅसेंजर बंद करू नयेत. - श्रीकांत रहाटकर
पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवाशी हे सर्वसामान्य, मजूर, गोरगरीब असतात. त्यामुळे तोट्यात असलेल्या पॅसेंजर जर एक्स्प्रेस केल्या तर सामान्यांचे काय?
- नीलेश जोगदंड, प्रवासी