सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 02:49 PM2021-07-06T14:49:02+5:302021-07-06T14:51:23+5:30
Lost his life in the temptation of selfies : शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
धर्माबाद ( नांदेड ) : धर्माबादपासून जवळच असलेल्या तेलंगणातील मौ. शिगणगाव म.तानूर येथील तलावावर सेल्फी काढताना तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यात दोन सख्ख्या बहिणी होत्या, तर एक नातेवाइकातील मुलगी मुखेड, जि.नांदेड येथील होती. ( girl along with two sisters drowned in the lake)
शिगणगाव हे धर्माबादपासून १० ते १२ कि.मी. अंतरावर असून, तानूर येथील स्मिता दादाराव येलमे (वय १५), वैशाली दादाराव येलमे (वय १३) व अंजली लोहबंदे (वय १४) या तिघी शेताकडे जातोत म्हणून घरून रविवारी सायंकाळी निघाल्या. काही वेळानंतर शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. लगेच तलावाकडे जाऊन तलावावर सेल्फी काढताना पाय घसरला. त्याचठिकाणी मोठा खड्डा होता, तिघींनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या.
सायंकाळ होऊन गेली, तरीही मुली न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला, मात्र कुठेच त्या आढळल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी ५ जुलै रोजी तिघींचेही मृतदेह तरंगताना आढळले. शेजारील शेतकऱ्यांना हे निदर्शनास आले. यानंतर ही घटना उघडकीस आली.