हलक्या दर्जाच्या मोबाइलमुळे ऑनलाइन कामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:47+5:302021-01-04T04:15:47+5:30
अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले असून ...
अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले असून त्याद्वारे अंगणवाडीचे कामकाज करण्याचे प्रशिक्षण दिले होते. पूर्वी अंगणवाडी सेविकांना रजिस्टरमध्ये माहिती लिहून ती प्रकल्प कार्यालयात सादर करावी लागत असे. हे काम खूप जिकिरीचे होते. मात्र, त्यानंतर अंगणवाडी सेविकांना मोबाइलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती आरटीएएम प्रत्यक्ष देखरेख प्रणालीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. स्मार्ट मोबाइलमध्ये काॅमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर असून यातून आयसीडीएस, सीएएस सर्व उद्दिष्ट पूर्ण केली आहेत.
जिल्ह्यातील २ हजार ८२१ अंगणवाडी सेविकांना मोबाइल वाटप करण्यात आले होते. मात्र, हे मोबाइल हलक्या दर्जाचे असल्याने ते सतत हँग होत आहेत. त्यामुळे संबंधित कामाचा खोळंबा होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक अंगणवाडी सेविकांना कामे करण्यात अडथळे येत आहेत. त्यात कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून सतत सूचना येत असतात. अशा वेळी अंगणवाडी सेविकांना हे मोबाइल डोकेदुखी ठरले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाइल दिल्यानंतर अंगणवाडीशी संबंधित सर्व कामे प्रत्यक्ष देखरेख प्रणालीतून करण्यात आली आहेत. त्यानंतर संबंधित अहवाल केंद्र प्रकल्पाकडे सादर केले जात आहेत. स्मार्ट फोनमुळे वेळेची बचत होत असली तरी अनेकदा हे मोबाइल हँग होत असल्याने दिलेल्या वेळेत कामे पूर्ण होत नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
कोरोना काळात बजावली महत्त्वाची भूमिका
जिल्ह्यात ३ हजार १० अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये २ हजार ८२१ अंगणवाडी सेविका तसेच ६९३ मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. तसेच २ हजार ६४२ मदतनीसही कामावर आहेत. कोरोना काळात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मोलाची भूमिका बजावली. कोरोना संकटात त्यांनी सर्वेक्षणाची मोलाची भूमिका पार पाडली होती. प्रारंभी देण्यात आलेल्या मोबाइलद्वारे त्यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले होते. काम सोपे व वेळेत व्हावे, यासाठी देण्यात आलेले मोबाइल आता कामात व्यत्यय निर्माण करीत आहेत. सतत होणाऱ्या हँगमुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत.