निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने विसर्गास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 04:22 PM2021-08-31T16:22:35+5:302021-08-31T16:24:54+5:30
प्रकल्पाला दोन कालवे आहेत.या प्रकल्पामुळे २३ हजार ३१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.
कंधार ( नांदेड ) : निम्न मानार प्रकल्प, बारूळ ता.कंधार ऑगस्ट अखेरीस १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाणी येवा ५ .१५७ द.ल.घ.मी. सुरु आहे. त्यामुळे १७७ स्वंयचलीत दरवाजातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग केला जात आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
निम्न मानार प्रकल्प गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भरला होता.त्याला अप्पर मानार प्रकल्प लिंबोटीमुळे आधार मिळाला होता. यंदा मात्र कंधार तालुक्यात जूलै महिन्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने बारूळ प्रकल्पात जलसाठा वाढला.बारूळ प्रकल्प १४६.९२१ द.ल.घ.मी. पाणी साठयाचा आहे. एकूण उपयुक्त साठा १३८.२११ द.ल.घ.मी.आहे. सोमवारी ( दि.३० ) तालुक्यात दुपारी व रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.तसेच माळाकोळी ता.लोहा मंडळात १९७ मि.मी.पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हे पाणी निम्न मानार प्रकल्पात जमा होत आहे. ५.१५७ द.ल.घ.मी.येवा चालू असल्याने प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे स्वंयचलीत दरवाज्यातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग होत आहे.
हेही वाचा - Video : नामी शक्कल ! पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार
प्रकल्पाला दोन कालवे आहेत.या प्रकल्पामुळे २३ हजार ३१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. कंधार तालुक्यातील ३८ गावातील ८ हजार हेक्टर, नायगाव व बिलोली तालुक्यातील ६१ गावातील १५ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांचा पाणी व पशुधनाचा चारा पाणी प्रश्न मिटला आहे.
सावधानतेचा इशारा
निम्न मानार शंभर टक्के भरला असून १ हजार ७४७ क्युसेस पाण्याचा मानार नदीत विसर्ग होत आहे. नदी काठावरील वसलेल्यानी नदी पात्रात उतरू नये. वाहने,जनावरे पात्रता सोडू नये.कोणतीही जीवीत व वित्त हानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
- एस.व्ही.शिराढोणकर (सहाय्यक अभियंता, बारूळ प्रकल्प श्रेणी -२)