एम. फिल. पीएच. डी. अनुसूचित जातीचे विद्यार्थी ‘बार्टी’च्या फेलोशिपपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:47+5:302021-04-26T04:15:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी या केंद्राची स्थापना ही राज्यातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी या केंद्राची स्थापना ही राज्यातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच या समाजातील संशोधकाना वाव देण्यासाठी करण्यात आली होती. परंतु बार्टीमार्फत २०१९-२० व २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपचे अर्ज मागविण्यात आले नाहीत; तर दुसरीकडे शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्र सार्थीने एम. फिल., पी. एचडी.च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप जाहीर केली आहे. मात्र अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांकडे ‘बार्टी’ने दुर्लक्ष केले आहे.
या संदर्भात नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट ॲण्ड यूथ फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून, बार्टीमार्फत राज्यातील सर्व अनुसूचित जातीतील एम. फिल., पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात यावेत; तसेच राज्यातील १०० संशोधक विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेटची फेेलोशिप सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचा विचार न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नसोसवायएफचे राज्य प्रवक्ता प्रा. सतीश वागरे, संदीप जोंधळे, मनोहर सोनकांबळे, आदींच्या सह्या आहेत.
चाैकट - फेलोशिपमध्ये ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संधी नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बार्टीकडून जाहीर केलेल्या राज्यातील विद्यापीठातील यादीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडला वगळले आहे. त्यामुळे या विद्यापीठातील अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी बार्टीकडे फेलोशिपसाठी प्रस्ताव दाखल करू शकत नाहीत. हा एक प्रकारे या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे राज्य प्रवक्ता प्रा. सतीश वागरे यांनी म्हटले.