किनवट येथे महा आरोग्य तपासनी शिबीर, १२०० डॉक्टर तपासणार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:49 AM2017-12-22T00:49:32+5:302017-12-22T00:50:43+5:30
नांदेड : किनवट येथील ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ९२ बाह्यरुग्ण विभाग स्थापन करण्यात येणार असून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.आतापर्यंत जवळपास १७ हजार रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : किनवट येथील ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ९२ बाह्यरुग्ण विभाग स्थापन करण्यात येणार असून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.आतापर्यंत जवळपास १७ हजार रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व शासकीय समिती प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहा. जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. डोंगरे म्हणाले, रुग्णांना या शिबिरात चांगली सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. रुग्णांना शिबीरस्थळी आणण्याचे व परत पोहोचविण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. नावनोंदणी, पाणीपुरवठा, अवयवदान, अपातकालीन परिस्थिती, औषधीपुरवठा, जनजागृती आदी बाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून बाह्यरुग्ण विभाग सुरु होणार आहे. या शिबिरात जवळपास ५ हजार स्वयंसेवक कार्यरत राहतील. नांदेड येथील श्री सचखंड गुरूद्वाराच्या वतीने रुग्ण, डॉक्टर, स्वयंसेवकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन ठिबक यांच्या वतीने केळी, फिनोलेक्स आणि मायलॉन कंपनीमार्फत औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मंडप उभारणीचे काम केले आहे.
चार ट्रक औषधीसाठा उपलब्ध
किनवट येथे होणाºया महाआरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर या पाच तालुक्यांतील गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. १२०० तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरास राज्यभरातून येणार आहेत. त्यामध्ये २०० आंतराष्ट्रीयख्यातीचे डॉक्टर आहेत. या शिबिरासाठी जवळपास चार ट्रक औषधीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. रोगानुसार वर्गवारी करुन येथे ८० मेडिकल उभारले जाणार आहेत.