जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
By श्रीनिवास भोसले | Published: October 31, 2024 07:51 AM2024-10-31T07:51:19+5:302024-10-31T07:52:49+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारसंघ टिकविण्याचे काँग्रेस, भाजपसमोर आव्हान : काँग्रेसचे बेरजेचे राजकारण, शिंदेसेनेचाही लागणार कस
Maharashtra Assembly Election 2024 : नांदेड : जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. मविआमध्ये सर्वाधिक ७ जागा मिळवत काँग्रेस मोठा भाऊ बनला आहे. महायुतीत भाजपने सर्वाधिक पाच जागा आपल्याकडे ठेवल्या तर शिंदेसेनेला तीन जागा दिल्या. अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. आघाडीत उद्धवसेनेला दोन आणि शरद पवार गटाला एक जागा मिळाली. परंतु, उद्धवसेनेच्या दोन्ही जागांवर मित्र पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज असल्याने या जागांचा ‘टाय’ आला आहे.
विधानसभा निवडणुकीत कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या नांदेडमध्ये २०१४ मध्ये शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसचे तीन, भाजप एक आणि राष्ट्रवादी एक असे बलाबल होते. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा मोठा पक्ष बनला. तसेच भाजप एकवरून तीनवर पोहोचला होता.
एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिंदेना साथ दिली. तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर कशाप्रकारे होतो, हे येणाऱ्या काळात कळेल. पण, विद्यमान सर्वच आमदारांना त्या त्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर पक्ष बदललेल्या आमदाराला देखील भाजपने संधी दिली आहे.
नांदेड उत्तर मध्ये शिंदेसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याविरूद्ध काँग्रेसने माजी महापौर अब्दुल सत्तार यांना संधी दिली आहे. भाजपचे बंडखोर मिलिंद देशमुख, उद्धवसेनेच्या संगीता डक पाटील देखील रिंगणात आहेत. नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासह शिंदेसेनेचे आनंद बोंढारकर आणि वंचितचे फारूख अहेमद रिंगणात आहेत. भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजया चव्हाण या भाजपच्या उमेदवार आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तिरूपती कोंढेकर रिंगणात आहेत.
हदगावमध्ये काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर, शिंदेसेनेचे बाबुराव कदम रिंगणात असून माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डाॅ.रेखा पाटील यांनी विद्यमान आमदाराला आव्हान दिले आहे. किनवटमध्ये भाजप आमदार भीमराव केराम विरूद्ध शरद पवार गटाचे प्रदीप नाईक अशी परंपरागत लढत होईल. मुखेडमध्ये भाजपचे आमदार डाॅ.तुषार राठोड यांना शिंदेसेनेचेच बालाजीराव खतगावकर यांनी आव्हान उभे केले आहे. काँग्रेसकडून माजी आमदार हणमंत बेटमोगरेकर रिंगणात आहेत.
नायगावमध्ये भाजपचे आमदार राजेश पवार विरूद्ध काँग्रेसच्या डाॅ.मीनल खतगावकर अशी लढत होईल. देगलूरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार जितेश अंतापूरकर विरूद्ध काँग्रेसचे निवृत्ती कांबळे अशी लढत आहे. लोहामध्ये शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. भाजपमधून अजित पवार गटात गेलेले शिंदे यांचे मेहुणे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर महायुतीकडून रिंगणात आहेत.
लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विरूद्ध भाजप
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी काँग्रेसने दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली तर भाजपने त्यांच्याविरोधात जिल्हाध्यक्ष डाॅ.संतुकराव हंबर्डे यांना रिंगणात उतरविले आहे. वंचितकडून अविनाश भोसीकर उमेदवार आहेत. काँग्रेसने बेरजेचे राजकारण करत नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात काॅंग्रेसचा उमेदवार दिला आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केलेले पक्षांतर.
नांदेड जिल्ह्यातील बेरोजगारी, सिंचनाचा प्रश्न आणि रखडलेले सिंचन प्रकल्प, लेंढीचा प्रश्न, बाभळीच्या पाण्याचा प्रश्न.
मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर.
नांदेडसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमध्ये बंद पडलेले प्रकल्प, कारखान्यांना लागलेली घरघर, नवीन एकही प्रकल्प नाही.
नांदेड येथून मुंबई रेल्वे आणि विमान सेवेसाठी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लढ्याला अद्यापपर्यंत यश मिळालेले नाही.
जिल्ह्यातील विधानसभांचे २०१९ मध्ये असे होते चित्र
मतदारसंघ विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना ६२८८४
नांदेड दक्षिण मोहनराव हंबर्डे काँग्रेस ४६९४३
भोकर अशोकराव चव्हाण (भाजपा) काँग्रेस १४०५५९
हदगाव माधवराव जवळगावकर काँग्रेस ७४३२५
किनवट भीमराव केराम भाजपा ८९६२८
मुखेड डाॅ. तुषार राठोड भाजपा १०२५७३
नायगाव राजेश पवार भाजपा ११७७५०
लोहा श्यामसुंदर शिंदे शेकाप १०१६६८
देगलूर जितेश अंतापूरकर (भाजपा) काँग्रेस ८९४०७