Maharashtra Bandh : नांदेडनजीक तिरूपती एक्स्प्रेसवर दगडफेक; विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:14 PM2018-08-09T16:14:25+5:302018-08-09T16:22:55+5:30
महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
नांदेड : महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. नांदेडपासून नजिक असलेल्या चुडावा परिसरातील गेट क्रमांक १३४ जवळ अज्ञात व्यक्तींनी तिरूपती एक्स्प्रेसवर दगडफेक केली़ परिणामी नांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास ११ गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती़ त्यानूसार राष्ट्रीय, राज्य मार्गासह नांदेड जिल्ह्यात जिल्हा मार्गदेखील बंद करण्यात आले़ रास्कारोकोमुळे सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या आहेत़ त्यातच चुडावा परिसरात अमरावती - तिरुपती एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली़ त्यामुळे ही गाडी चुडावा-नांदेड दरम्यान जवळपास दिड तास थांविण्यात आली. विभागात ठिकठिकाणी झालेल्या रेलरोकोमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे़ नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस चुडावा-पूर्णा दरम्यान तीन तास तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या औरंगाबाद स्थानकावर थांबवून ठेवल्या आहेत़
पाच गाड्या रद्द, सहा अंशत: रद्द
नांदेड विभागातील परिस्थिती लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ पाच गाड्या रद्द तर सहा गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत़ यामध्ये गाडी संख्या ५७५४० परळी - अकोला, गाडी संख्या ५७५८३ अकोला-पूर्णा आणि गाडी संख्या ५७५१२ परभणी-नांदेड, गाडी संख्या ५७५५२ आदिलाबाद-पूर्णा, गाडी संख्या ५७५३९ अकोला-परळी या पाच सवारी गाड्या ९ आॅगस्ट रोजी पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत़ तर गाडी संख्या ५७५५४ आदिलाबाद-परळी सवारी गाडी गुरूवारी पूर्णा-परळी दरम्यान रद्द केली़ गाडी संख्या ५७५४१ नगरसोल-नांदेड सवारी गाडी परभणी ते नांदेड दरम्यान रद्द, गाडी संख्या ५७५६२ मनमाड-काचीगुडा सवारी गाडी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द करण्यात आली आहे़
दरम्यान, काचीगुडा गाडीचा रेक गाडी संख्या ५७५६१ बनून परभणी-मनमाड अशी धावेल. त्याचबरोबर गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा-मनमाड सवारी गाडी ९ रोजी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली़ या गाडीचा रेक गाडी संख्या ५७५६२ बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल. दरम्यान, नांदेड विभागातून सोडण्यात येणाऱ्या इतर गाड्या वेळेवर धावाव्यात तसेच रेलरोकोमुळे होणारा परिणाम यावर नांदेड विभागातील अधिकारी लक्ष ठेवून आहेत़ रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असून सर्वांनी संयम बाळगावा, नुकसान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.