'अशोकराव राहुल गांधींना भोकरला आणा'; त्यांच्या प्रचाराने मत कमी पडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 08:15 PM2019-10-14T20:15:51+5:302019-10-14T20:26:06+5:30
प्रतापराव तुम्ही जॉईंट किलर झालात आता बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे पुढचे जॉईंट किलर बनतील
मुदखेड :राहुल गांधी जिथे जिथे प्रचाराला जातात तिथे काँग्रेसचे मतदान कमी होते हा इतिहास आहे. त्यामुळे माझी अशोकरावांना विनंती आहे की त्यांनी राहुल गांधी यांना प्रचारासाठी भोकरला आणावे अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मुख्यमंत्री बारड येथील प्रचारसभेत बोलत होते.
भाजपचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रचारासाठी मुदखेड तालुक्यातील बारड येथे मुख्यमंत्र्याच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आल होत. या प्रचारसभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यानी स्वर्गीय साहेबराव बारडकर यांची विशेष आठवण काढली. बारडकर यांनी २५ वर्ष केलेल्या सेवेचा त्यांनी विशेष उल्लेख केला यावेळी बोलतांनी मुख्यमंत्री फडवणीस यांनी राहुल गांधीवर टीका केली. राहुल गांधी काल मुंबईत म्हणाले की, सत्तर वर्षात देशाचा विकास झाला नाही पण गांधी हे विसरले की या सत्तर पैकी साठ वर्ष काँग्रेसचीच सत्ता होती. ते अश्या पद्धतीने बोलल्याने उमेदवारांचे चेहरे पडले होते असा उल्लेख मुख्यमंत्री यांनी केला.
राहुल गांधी जिथं जिथं प्रचाराला जातात तिथे काँग्रेसचे मतदान घटत असते त्यामुळे अशोकरावांना विनंती आहे की त्यांनी राहुल गांधीला भोकरला प्रचारासाठी आणावे. नांदेडच्या मतदारांनी चव्हाण यांना लोकसभेत घरी बसवले, त्यामुळे मला वाटलं की ते आता पुढच्या लोकसभेची तयारी करतील, पण ते विधानसभेला मैदानात उतरले , प्रतापराव तुम्ही जॉईंट किलर झालात आता बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे पुढचे जॉईंट किलर बनतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
५ वर्षात १५ वर्षापेक्षा जास्त काम
या भागाच्या विकासासाठी बापूसाहेबांना निवडून द्या पुढच्या 3 महिन्यात चकचकित रस्ते बनवतो अस आश्वासन त्यांनी दिलय. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा आम्ही पाच वर्षात जास्त कामे केली असा दावा त्यांनी या सभेत बोलताना केला. आपल्या भाषणात त्यांच्या सरकारच्या कामांचा पाढाच मुख्यमंत्र्यानी वाचला. कलम 370 वरही ते बोलले. दरम्यान बारड इथल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
आजचा आणि उद्याचा मुख्यमंत्री
प्रतापराव पाटील यांनी आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी या भागाचे पाणी कुठेही जाऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. आजचा आणि उद्याचा मुख्यमंत्री म्हणून मी हा शब्द देत असल्याचे ते भाषणाच्या शेवटी म्हणाले. अशोक चव्हाण यांना इथल्या लोकांनी दोन वेळा मुख्यमंत्री केले पण मराठवाड्यात पाणी आणण्याच काम त्यांनी केले नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री फडवणीस यांनी याच सभेत केली.