Maharashtra Election 2019: खोटारडेपणा भाजप-शिवसेना सरकारच्या अंगी ठासून भरलाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:06 PM2019-10-19T21:06:23+5:302019-10-19T21:10:18+5:30
Maharashtra Election 2019: सरकार तुमचे असताना जबाबदार मी कसा?
नांदेड : तेलंगणाच्या सीमेवरील जनतेने तेलंगणात सामावून घेण्याची मागणी केली आहे़ तुमच्या मनातील तेलंगणात जायचा विचार सोडा अन् भाजप-सेनेला सत्तेतून हटवा़ राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, मग विकास पहा़ खोटारडेपणा या सरकारच्या अंगी ठासून भरला आहे़ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले़
भोकर विधानसभा मतदारसंघात थेरबन, हाळदा, भोसी या ठिकाणी प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी चव्हाण बोलत होते़ चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली़ म्हणजेच एका शेतकऱ्याला ७ लाख ३० हजार रुपये मिळाले असे होते़ परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही़ किती खोटे बोलावे यालाही काही मर्यादा आहेत की नाही़ परंतु खोटारडेपणा यांच्या अंगात ठासून भरला आहे़ या भागातील रस्ते खराब झाले़ हे रस्ते केंद्र सरकारचे असून त्याचे मंत्री नितीन गडकरी हे आहेत़ मग या रस्त्यांची जबाबदारी भाजपाचीच ना? सरकार तुमचं असताना फाशी आम्हाला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार झाला, जि़प़अध्यक्ष होता़ त्यांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत़ याचा काटा काढू, त्याचा काटा काढू असे खासदार जाहीर भाषणात बोलत आहेत़ खासदारांना अशी भाषणा शोभनीय नाही़ परंतु त्यांची तीच संस्कृती अन् प्रवृत्ती आहे़ अशोक चव्हाण अन् गोरठेकरांची तुलना होवू शकते काय? कर्जमाफी नाही, पीक विमा नाही, घरकुल योजना रखडली, संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ अशा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे़ जाहीरनाम्यात काँग्रेसने जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यात येतील, असेही चव्हाण म्हणाले़ यावेळी आ़अमरनाथ राजूरकर, सुभाष किन्हाळकर, सुभाष कोळगावकर, रामराव देशमुख, सुभाष चटलावार, आनंदराव पाटील मांजरीकर, आंनद गुंडीले, लक्ष्मण डोंगरे, सुभाष सोनकांबळे, नरसय्या रेड्डी, गणेश पोशेट्टी, महेश शेट्टी, सुधाकर शिंदे यांची उपस्थिती होती़
भावनेच्या भरात लोकसभेत चूक झाली-किन्हाळकर
सुभाष पा़किन्हाळकर म्हणाले, ज्यांनी गोरठेकरला जि़प़अध्यक्ष, आमदार केले़ त्यांनाच गोरठेकर विसरले आहेत़ आपल्याला काम करणारा उमेदवार पाहिजे़ लोकसभेत भावनेच्या भरात चूक झाली़ त्याची पुनरावृत्ती आता कदापि होणार नाही़ गोविंद बाबा गौड म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात अशोकरावांनी विकासकामे केली आहेत़ शंकररावांच्या प्रयत्नांनी या परिसरात हरितक्रांती झाली आहे़ परंतु पीकविमा, रस्ते या मुद्यावरुन अशोकरावांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे़ सरकार भाजप-शिवसेनेचे असताना जबाबदार अशोकराव कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़