सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:21 PM2019-10-15T17:21:32+5:302019-10-15T17:23:31+5:30

सरकारचा केवळ घोषणांचा सुकाळ

Maharashtra Election 2019 : The government put a debt of Rs 5 lakh crore on the state: Ashok Chavan | सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

Next
ठळक मुद्देभाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ 

नांदेड : सर्व महत्त्वाच्या विषयांवर वेळ मारुन नेण्याचे काम करणाऱ्या सरकारने राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे़ भाजप-सेनेला राज्यही नीट चालविता येत नसल्याचेच यावरुन स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली़

भोकर मतदारसंघातील आंबेगाव, बारसगाव, कामठा बु़मालेगाव या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या़ यावेळी चव्हाण म्हणाले, येथील जनता तोंड पाहून प्रेम न करता ते मतपेटीद्वारे व्यक्त करते़ या भागातील मतदार शंकरराव चव्हाण असोत की, अशोकराव चव्हाण  यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची नेहमी प्रचिती येते़ आम्हाला बोलू दिले जात नसल्याची खंत तरुणाईने व्यक्त केली होती़ त्यामुळे युवा संवाद कार्यक्रम घेवून तरुणाईला मोकळेपणाने आपल्या समस्या मांडण्याची संधी दिली़ तरुणांनाही हे राज्य, देश सांभाळायचे आहे़ त्यामुळे जुन्या माणसांना सांभाळा, गाव तुम्हालाच सांभाळून घ्यायचे आहे़ आजचे भाजप-सेना सरकार केवळ खोटे बोलून वेळ मारुन नेत आहे़ २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु अद्यापही त्याचा मागमूस नाही़ सत्तेत आल्यानंतर मात्र काँग्रेस सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली़

भाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ 
शेतकरी त्रस्त, बेरोजगारीत वाढ, कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही, महिलांचे प्रश्न ‘जैसे थे’, रस्त्यांची दुरवस्था असताना सरकारकडून  धादांत खोटा प्रचार केला जात आहे़ तूर खरेदी करणे अन् त्याचे पैसे देण्याचे काम सरकारचे़ त्यात मी जबाबदार कसा? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला़ परंतु केवळ कलम ३७० च्या नावाने ढोल बडविण्याचे काम सुरु आहे़ ३७० मुळे तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला का? संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही़ त्या लाभार्थ्यांचे पाप भाजप-सेना सरकारला लागणार आहे, असेही चव्हाण म्हणाले़

यावेळी बालाजी गव्हाणे, संजय लहानकर, पप्पू कोंडेकर, अमोल डोंगरे, श्याम टेकाळे, संतोष गव्हाणे, गोविंद मुसळे, उद्धवराव राजेगोरे, बाळासाहेब मुसळे, गणेश बोंडारे, मदन देशमुख, रणजित मुसळे, उत्तमराव कल्याणकर, विरभद्र नांदेडकर यांनी मनोगत व्यक्त केले़ व्यासपीठावर बाळासाहेब डोंगरे, रमेश नांदेडकर, शिवानंद शिप्परकर यांची उपस्थिती होती़ 

वाढप्या आपला असावा लागतो
बाहेरचा म्हणजेच आयात केलेला उमेदवार विकासकामे किती करणार?  त्यासाठी वाढप्या आपला असावा लागतो़ अशोकराव चव्हाण यांनी न मागता आंबेगाव परिसरात विकासकामे केली़ गेल्या पाच वर्षांत सरकारने केवळ थापा मारल्या़ अशोकरावांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली गेली आहे़ भाजप-सेनेला तोंड दाखविण्यासाठी जागा उरली नाही़ त्यामुळे मूळ प्रश्नांना ते बगल देत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली़ 
 

Web Title: Maharashtra Election 2019 : The government put a debt of Rs 5 lakh crore on the state: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.