Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपनेच एकमेकांविरोधात थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:27 AM2019-10-05T07:27:02+5:302019-10-05T07:27:22+5:30
पक्षश्रेष्ठींकडून स्वबळाच्या गर्जना होत असल्याने शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती. ही तयारीच आता शिवसेनेला भोवते आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड : पक्षश्रेष्ठींकडून स्वबळाच्या गर्जना होत असल्याने शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती़ ही तयारीच आता शिवसेनेला भोवते आहे़ जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात शिवसेना-भाजपाच्या इच्छुकांनीच एकमेकांविरोधात उमेदवारी दाखल केली असून युतीसमोर आता बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे़ दुसरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोहा मतदारसंघात निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी अखेरच्या क्षणी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेतला आहे़
नांदेड शहरातील दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटले आहेत़ दक्षिणमधून शिवसेनेतर्फे राजश्री पाटील तर उत्तरमधून बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपा बंडखोराचे सेनेसमोर आव्हान आहे़ भाजपाचे शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी पदाचा राजीनामा देत रिंगणात उडी घेतली आहे़ तर दुसरीकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजश्री पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत़ नांदेड उत्तर मतदारसंघातही भाजपाकडून बंडाचे निशाण फडकले आहे़ येथे शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांच्याविरोधात भाजपच्या मिलिंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़
किनवट मतदारसंघातही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे़ भाजपने येथून माजी आ़ भीमराव केराम यांना ऐनवेळी रिंगणात उतरविले़ मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे़ संध्या राठोड यांनी येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़ दुसरीकडे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार ज्योतीबा खराटे यांनीही अर्ज भरल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आ़ प्रदीप नाईक यांचा मार्ग सुकर झाला आहे़ भोकर मतदारसंघात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपाने माजी आ़बापूसाहेब गोरठेकर यांना
रिंगणात उतरविले आहे़ मात्र येथेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़ हदगाव मतदारसंघात शिवसेनेने आ़ नागेश पाटील आष्टीकर यांना पुन्हा संधी दिली आहे़ मात्र पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाला विरोध करीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे़ कदम यांची बंडखोरी कायम राहिल्यास शिवसेना उमेदवार नागेश पाटील यांना फटका बसू शकतो़
चिखलीकर यांचे मेहुणे निवडणुकीच्या रिंगणात
लोहामध्ये खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही होते़ मात्र शिवसेनेने ही जागा स्वत:कडे कायम ठेवत तेथून मुक्तेश्वर धोंडगे यांना रिंगणात उतरविले़ त्यामुळे अखेरच्या क्षणी शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षातर्फे आपली उमेदवारी दाखल केली़ बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवल्यास काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतात़