महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीने अधिकारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:41+5:302021-06-25T04:14:41+5:30
नांदेड : शिवसेनेने कायमच मराठीचा पुरस्कार केला आहे. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पदाेन्नतीसाठी हिंदी भाषा सक्तीची केल्याने ...
नांदेड : शिवसेनेने कायमच मराठीचा पुरस्कार केला आहे. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पदाेन्नतीसाठी हिंदी भाषा सक्तीची केल्याने अनेक अधिकाऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मराठीला पर्याय म्हणून शाळेत संस्कृत भाषा निवडलेल्या सहाय्यक पाेलीस निरीक्षकांवर आता पदाेन्नतीसाठी ऐनवेळी हिंदीतून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पाेलीस महासंचालक कार्यालयाने नुकतीच राज्यातील ४५० सहाय्यक पाेलीस निरीक्षकांची ज्येष्ठता यादी जारी केली. त्यांना पदाेन्नती देऊन पाेलीस निरीक्षक बनविले जाणार आहे. या अधिकाऱ्यांसाठी मराठी, हिंदीतून शिक्षण घेतलेले असणे बंधनकारक केले आहे. परंतु यातील अनेक अधिकाऱ्यांनी दहावीमध्ये मराठीला पर्यायी भाषा म्हणून हिंदीऐवजी संस्कृतला प्राधान्य दिले हाेते. हे अधिकारी आता या भाषेमुळे अडचणीत आले आहेत. कारण हिंदीतून शिक्षण नाही तर पदाेन्नतीही नाही, असा शासनाचा नियम आहे. यापूर्वीच्या १०० व १०१च्या तुकडीतील अनेक सहाय्यक पाेलीस निरीक्षकही संस्कृतमुळे पदाेन्नतीत मागे पडले हाेते. नंतर त्यांना ऐनवेळी वर्धा येथील हिंदी विद्यापीठ, शासनाचे हिंदी भाषा संचालनालय येथून परीक्षा देऊन हिंदीचे प्रमाणपत्र मिळवावे लागले. नंतर कुठे त्यांना बढती दिली गेली. परंतु ताेपर्यंत त्यांच्या साेबतचे अधिकारी ‘सिनिअर’ बनले हाेते. आता १०२च्या तुकडीतील अनेक सहाय्यक पाेलीस निरीक्षकांवरही पदाेन्नतीसाठी ऐनवेळी हिंदीची परीक्षा देण्याची वेळ आली आहे. काहींनी हिंदी संचालनालयामार्फत हिंदीतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अर्जही भरला. परंतु काेराेनामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या. त्यामुळे या पाेलीस अधिकाऱ्यांपुढे माेठा पेच निर्माण झाला आहे.
गृहमंत्र्यांच्या नावाने ट्विट....
यातीलच एका अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे ट्विट केले. त्यात २० वर्षं सेवा झाली असल्याने आमची पदाेन्नती थांबवू नका, पाहिजे तर एमएच-सीईटीच्या धर्तीवर हिंदीचे प्रमाणपत्र लगतच्या काळात सादर करण्याबाबत हमीपत्र लिहून घ्या, अशी विनंती केली गेली. दहावीत असताना शासनानेच पर्यायी भाषा म्हणून संस्कृत हा विषय दिला, त्यामुळे तेव्हा हिंदीऐवजी संस्कृतची निवड केली, त्यात आमचा दाेष काय, असा सवाल अनेक एपीआय उपस्थित करीत आहेत.
चाैकट........
डीजी ऑफिस म्हणते, सर्वच विभागांना लागू.....
दरम्यान, संस्कृत व हिंदीच्या या वादाबाबत राज्याच्या पाेलीस महासंचालक कार्यालयाकडे चाैकशी केली असता, पदाेन्नतीसाठी मराठीसाेबत हिंदी बंधनकारक असल्याबाबतचा जीआर सामान्य प्रशासन विभागाने १ ऑगस्ट २०१९ राेजी जारी केला आहे. ताे केवळ पाेलिसांसाठी नसून शासनाच्या सर्वच विभागातील व सर्वच संवर्गाच्या अधिकाऱ्यांसाठी लागू असल्याचे सांगण्यात आले.
चाैकट..
पाेलीस निरीक्षकांच्या २७० जागा रिक्त.....
निरीक्षक पदावरील बढतीसाठी ४५० एपीआयची सेवाज्येष्ठता यादी जारी करण्यात आली असली तरी, आजच्या घडीला राज्यात पाेलीस निरीक्षकांच्या २७० जागा रिक्त आहेत. त्यात मुंबई व परिसराचा समावेश असलेल्या काेकण-२ विभागातील सर्वाधिक १८५ जागांचा समावेश आहे. पुणे परिक्षेत्रात ३१, औरंगाबाद १४, नागपूर १३, नाशिक १३, अमरावती ५ तर काेकण-१ विभागात पाेलीस निरीक्षकांच्या चार जागा रिक्त आहेत.