मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:50+5:302021-01-24T04:08:50+5:30

भोकर (जि.नांदेड) : भाजप सरकारला सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही. केवळ भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्याचे काम या सरकारकडून केले जात असून ...

Mahavikas Aghadi is committed for the development of Marathwada | मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

Next

भोकर (जि.नांदेड) : भाजप सरकारला सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही. केवळ भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्याचे काम या सरकारकडून केले जात असून केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगारांविषयीचे दोन्ही कायदे मारक असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले. मागील राज्य शासनाच्या काळात मराठवाड्याचा विकास थांबला आहे. या विकासाला महाविकास आघाडीने पुन्हा गती दिल्याचे सांगत या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

भोकर शहरासह व तालुक्यातील १९४ रुपये कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महाआघाडीच्या वतीने शहरातील मोंढा मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवशी बु. येथील मयत बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, सभापती बाळासाहेब रावणगावकर, संजय बेळगे, रामराव नाईक, पं.स. सभापती नीता रावलोड, माजी सभापती गोविंदबाबा गौड, नागनाथराव घिसेवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आगामी भोकर पालिका निवडणूक अनुषंगाने बोलताना जो लोकांना मान्य तोच मला मान्य राहणार असून जनसमर्थन दाखविणाऱ्यांनाच उमेदवारी मिळेल असे सुतोवाच त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यासह तालुक्यात महाआघाडी सरकारने मंजूर केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी भाषणात मांडला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी तर सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले. शेवटी जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.

चाैकट .......

विरोधक अवैध व्यवसायात मग्न

लोकसभेत या भागाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पाळज येथील गणराया पुढे केलेली घोषणा खोटी ठरली, पाळज तीर्थक्षेत्र श्रद्धेचे ठिकाण आहे, दुकान नाही असा टोला लगावत जिल्ह्यात अवैध धंद्याचे अड्डे कोणाच्या राजकीय वरदहस्ताने चालतात हे जिल्हावासियांना माहीत आहे. जनतेच्या विकास कामांचे त्यांना देणे-घेणे नसल्याची टीका करीत जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेले हे अवैध धंदे मोडीत काढू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

महाआघाडीत बिघाडी होणार नाही

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काॅँग्रेससह मित्रपक्षांना जिल्ह्यात दमदार यश मिळाले आहे. विजयी झालेल्या सदस्यांनी एकोप्याने राहून गावाचा विकास करावा. अशा गावकारभाऱ्यांच्या पाठीशी कायम राहीन, अशी ग्वाही देत राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात एकोपा झाल्यामुळेच भाजपाला रोखता आले. राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठबळ असल्यामुळे राज्यातील महाआघाडीत बिघाडी होणार नाही, संपूर्ण पाच वर्ष सरकार सत्तेत राहील असे ते म्हणाले.

(फोटो कॅप्शन -

भोकर शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीच्या पहिला मजला कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगारानी अंबुलगेकर, काॅँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील , पंचायत समितीच्या सभापती निता रावलोड, बाबुराव सायाळकर आदी.)

(फोटो क्रमांक - २३एनपीएच जेएएन ०८ जेपीजी)

Web Title: Mahavikas Aghadi is committed for the development of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.