माहूर तालुक्यात ३४१ जंगली प्राण्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:18 AM2019-05-26T00:18:22+5:302019-05-26T00:20:32+5:30
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे.
श्रीक्षेत्र माहूर : बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे.
माहूर तालुका हा सह्याद्री पर्वतरागांत मौल्यवान वृक्षांच्या घनदाट जंगलानी व्यापला आहे. तालुक्यात एकूण १३ हजार ६१७.९८१ हेक्टरच्यावर वनक्षेत्र असून मेंडकी, पाचोंदा, मांडवा, गोंडवडसा, माहूर ही पाच वनपरिमंडळ आहेत.
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ७७०.८३ हेक्टर असून त्यापैकी जंगलाखालील क्षेत्र १३ हजार ६१७.९८१ हेक्टरवर सह्याद्री पर्वताच्या रांगेत घनदाट जंगल आहे. हे जंगल अगदीच घनदाट असून यामध्ये बिबट्या, रोही, तडस, अस्वल, रानडुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, हरिण यासह हिंस्त्र पशू-पक्षी जंगली श्वापदे आढळतात. या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे गत दोन महिन्यांपासून जंगलामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात ट्रक्टर, टँकरने पाणीपुरवठा करून जंगली प्राण्यांची तृष्णा भागविण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या मानवी वस्त्यांमुळे जंगल कमी होत चालले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सध्या जंगल परिक्षेत्रात किती प्राणी आहेत, कोणत्या प्राण्यांची संख्या जास्त आहे, याचे निरीक्षण करण्यासाठी वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला नियोजन केले जाते. १७ व १८ मे रोजी जंगल परिक्षेत्रात वनखात्याच्या वतीने प्राण्यांची गणना करण्यात आली आहे.
वन्यप्राणी गणनेसाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी वनविभागाच्या २ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पाठविल्याची वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली.
माहूरच्या जंगलात बिबट्याचा वावर असतो. मागील काळात बिबट्याने केलेल्या हल्ल्याची नोंदही वन विभागात सापडते. मात्र बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणीगणनेत बिबट्या मिस झाला. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या गणनेत बिबट्या आढळून न आल्याने जंगलातील एकूण प्राण्यांच्या संख्येत बिबट्याचा उल्लेख आलेला नाही.
पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यातील काही भागामध्ये वाघाचा वावर असून ये-जा करण्यासाठी सदरील अभयारण्याचा वापर करीत असल्याचे गृहीत धरून ट्रॅप कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
तालुक्यातील वाढलेली प्राणी व पक्षी यांची संख्या सुरक्षित राहण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहूर वनविभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, असेही कवळे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, माहूर व किनवट तालुक्यातील जंगलातून सागवान लाकडासह अन्य लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. या तस्करीला आळा घातल्यास वन्यप्राण्यांची संख्या आणखी वाढू शकणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्राण्यांमध्ये सर्वाधिक नीलगाय
पाणवठ्यावर रात्री पहारा देऊन पाणी पिण्यासाठी येणाºया प्राण्यांची माहिती वनकर्मचाºयांनी नोंदविली. त्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून जंगल परिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या आकडेवारीचा अंदाज काढण्यात आला आहे. माहूर जंगल परिक्षेत्रात सर्वाधिक आढळणाºया प्राण्यांमध्ये नीलगाय १२९, भेकडी १, वानर ८७, अस्वल १०, रानमांजर २, ससा ८, रानडुक्कर १०४ असे नर, मादी, पिल्ले मिळून एकूण ३४१ वन्यप्राण्यांची गणना झाली़ तर राष्ट्रीय पक्षी असलेले मोर ८८, घुबड ४, बगळे ५९, चिमणी ४५, टिटवी ३०, सुतार पक्षी १, पोपट २०, कावळा ६६ असे एकूण ३१३ पक्ष्यांची गणना करण्यात आली आहे.