माहूर शहरातील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:54 AM2018-12-20T00:54:46+5:302018-12-20T00:55:57+5:30
दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़
श्रीक्षेत्र माहूर : गेल्या पाच महिन्यांपूर्वी माहूर नगरपंचायतला रूजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी काल ४० वर्षांपूर्वीचे अतिक्रमण काढल्याने त्यांच्या कामाची चर्चा सुरू आहे़ दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़
१८ रोजी नगरपंचायतच्या जागेवर असलेले संजय गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे ९ गाळे ४० वर्षांआधी बांधण्यात आले होते़ या गाळ्यांत दुकानदारांनी भाडेवाढ न करता परस्पर गाळे विक्री केल्याच्या घटना घडल्याच्या चर्चा होत होत्या़ तसेच सदरील गाळ्यांचे बांधकामही धोकादायक स्थितीत आल्याने ऩ प़ कडून गाळे रिकामे करण्यासाठी लेखी पत्र देण्यात आले होते़ त्या पत्रावरून हे गाळे पाडू नये म्हणून न्यायालयातून स्थगिती मिळविण्यात आल्याने येथे उभे राहणारे नियोजित कॉम्प्लेक्सचे कामही रखडले होते़
१८ रोजी मुख्याधिकारी विद्या कदम यांनी न्यायालयीन प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करून अतिक्रमण पथकप्रमुख कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांना ९ गाळे पाडण्याचे आदेश दिल्याने हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले़ त्यामुळे आता येथे गाळे उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ऩप़च्या उत्पन्नात मोठी भर पडून शेकडो नागरिकांचे दुकानदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे़
१९ रोजी मुख्याधिकारी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पथकप्रमुख वैजनाथ स्वामी यांच्यासह २ जेसीबी, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, पो़नि़ लक्ष्मण राख यांच्यासह पोलीस कर्मचारी ५० मजुरांसह प्रभाग क्ऱ १७ मधील सदर अतिक्रमण काढले़ दत्तजयंती यात्रेनंतर शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने अतिक्रमणधारकांनी आमचे अतिक्रमण काढू नये असे विनंतीवजा पत्र दिल्याची चर्चाही अनेक ठिकाणी होत होती़