नवरात्रोत्सवासाठी माहूरगड सजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:43 AM2018-10-10T00:43:54+5:302018-10-10T00:44:53+5:30
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़
१० आॅक्टोबर रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सकाळी सात ते साडेअकरादरम्यान श्री रेणुकादेवीच्या वैदिक पूजेस प्रारंभ, वेदघोष, रेणुकादेवीच्या मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना होणार आहे. गडावर नवरात्रनिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले असून या काळात लाखो भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देवी माहात्म्यात नवरात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा पवित्र काळ. सतत नऊ दिवस रणचंडिकेने दृष्ट राक्षसांसोबत घनघोर युद्ध करून आपला पराक्रम दाखविला तो कालखंड. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीने पराक्रम करुन विजयादशमीस विजय संपादित केला. त्याच काळाला शारदीय नवरात्र असे म्हणतात.
माहूर येथे दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात दि. १० प्रतिपदा/द्वितीयापासून पंचमीपर्यंत नितीन जयसिंग धुमाळ यांचे सनईवादन सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. तर प्रतिपदेलाच सायंकाळी डॉ. अविराज तायडे (नाशिक) यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, तृतीया ह.भ.प प्रज्ञा देशपांडे कीर्तनकार पुणे, चतुर्थीला किराणा घराण्याचे युवक गायक रामेश्वर डांगे (पुणे),ललिता पंचमीला मुख्य कार्यक्रम प. डॉ.पराग चौधरी (औरंगाबाद), भक्ती संगीत संजय जोशी (नांदेड),विलास गरोळे व राजेश्री जोशी (नांदेड), प्रसन्न जोशी (नागपूर),आनंदी व भार्गवी विकास मालेगावकर यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत असणार आहे.
पंचमीला ऋतुराज संगीत विद्यालय, अकोलाचे जयपूरकर आणि संच, शष्ठीला अभिजित रत्नाकर आपस्तव, मालती आपस्तव यांचे गायन. सप्तमी, अष्टमीला नलिनी विनायक वरणगावकर यांचे कीर्तन, नवमीला हवन पूर्णाहुती पूजा व दसºयाला परशुराम पालखीसोहळा (सीमोल्लंघन) होणार आहे. परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेला २३ रोजी स्नेहा भाले (औरंगाबाद), राजन डांगे (चिखली , बुलढाणा), प्रदीप कोरटकर, संजय कोरटकर (पुसद) यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
यासंदर्भात झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, सचिव व सहायक जिल्हाधिकारी शक्ती कदम, प्रभारी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, श्रीपाद भोपी, विनायक फांदाडे, आशिष जोशी यांची उपस्थिती होती़