भोकरच्या प्रमुख रस्त्यांचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:13+5:302020-12-08T04:15:13+5:30

भोकर - शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण, अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहतूक यामुळे दुभाजकासह प्रशस्त चारपदरी रस्ता असूनही वाहतूक कोंडीचा ...

The main roads of Bhokar are suffocating | भोकरच्या प्रमुख रस्त्यांचा श्वास गुदमरतोय

भोकरच्या प्रमुख रस्त्यांचा श्वास गुदमरतोय

Next

भोकर - शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण, अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहतूक यामुळे दुभाजकासह प्रशस्त चारपदरी रस्ता असूनही वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहर विकासासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येऊन डॉ. आंबेडकर चौक ते लहुजी चौकापर्यंत दुभाजकासह रस्ता तयार झाला. तरीही प्रमुख रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांनी नालीची सीमारेषा ओलांडून ठिकठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यातच सदरील रस्त्यावर डांबरी रस्त्यासह काँक्रीट रस्त्यापर्यंत दुचाकी, अ‍ॅटो, चारचाकी वाहने आणि हातगाडे यांचे बस्तान होत आहे. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होऊनही रहदारीसाठी फक्त एकेरीच रस्ता वापरात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

रेल्वे उड्डाणपुलाचे काम झाली डोकेदुखी

शहरातील रेल्वे गेटवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम तीन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. सदरील कामात उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राट कंपनीने आधी दिरंगाई केली. त्यानंतर वर्षभरापूर्वी रेल्वे विभागाने रेल्वे रुळावरील कामास सुरुवात केली. ते सुद्धा काम संथ गतीने होत असल्याने या मार्गावरील वाहतूक डोकेदुखी झाली आहे. बांधकाम सुरू असल्याने मागील तीन वर्षांपासून धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच आता पालिकेने भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा अद्यापपर्यंत उपलब्ध करुन दिली नसल्याने निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली बाजार भरत असल्यामुळे नांदेड रस्त्यावर रहदारीच्या अडथळ्यात भर पडली आहे. एकूणच शहरातील रस्ते कधी मोकळे होतील व वाहतुकीची कोंडी कधी फुटेल याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

Web Title: The main roads of Bhokar are suffocating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.