शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:49 PM2022-03-30T12:49:57+5:302022-03-30T12:53:36+5:30

सध्या यूपीएच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. यूपीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन त्यांची निवड केली आहे.

Making Sharad Pawar president of UPA may be personal opinion of NCP workers: Nana Patole | शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

Next

नांदेड - शरद पवारांना (Sharad Pawar) यूपीएचा (UPA) अध्यक्ष करणे हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, त्यामुळे यावर आताच काही चर्चा करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. ( Nana Patole on Sharad Pawar and UPA leadership) 

भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे एकत्रित नेतृत्व करावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी बैठकीत मांडला. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. 

यावेळी सर्वानुमते शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. या ठरावावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जास्त बोलण्याचे टाळत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 
नाना पटोले हे मंगळवारी सायंकाळी नांदेड विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष होण्याबाबत शुभेच्छा असतील काय, हा प्रश्न विचारला असता त्यांनी अधिक बोलण्याचे टाळत, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते अशी प्रतिक्रिया दिली. 

हा नवीन विषय नाही : अशोक चव्हाण 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने यूपीएचा अध्यक्ष कोणाला करावे, हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते. परंतु सध्या यूपीएच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी ( Sonia Gandhi) आहेत. यूपीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन त्यांची निवड केली आहे. त्यामुळे हा काही नवीन विषय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु यूपीए अध्यक्ष पदाचा विषय सर्व घटक पक्षांनी ठरविला असल्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Making Sharad Pawar president of UPA may be personal opinion of NCP workers: Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.