मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:22 AM2018-10-29T00:22:36+5:302018-10-29T00:23:27+5:30
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे.
शरद वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी पालकमंत्री यांनी निधी देवून ट्रामा केअर सुरू करण्याची मागणी जि.प. सदस्य नागोराव इंगोले यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी २००९ मध्ये मालेगाव येथे ट्रामा युनिट केअर सेंदटर सुरू करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची ९ पदेही मंजूर करण्यात आली होती. परंतु सदरील ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सलंग्नित असावेत, अशी तांत्रिक अडचण समोर आली आहे. ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
यासाठी एकूण २५ डॉक्टर व कर्मचारी यांचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फंत आरोग्य, उपसंचालक लातूर याच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु उपसंचालक कार्यालयाकडून अद्यापही सदरील प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला नाही. माजी जि.प. सदस्य नागोराव इंगोले यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे ट्रामा केअर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मालेगाव येथून कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गाावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.
अपघातग्रस्तांना उपचारासाठी ट्रामा नसल्याने जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे मालेगाव येथील ट्रामा केअर युनिट सेंटर सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी मुख्य इमारतीसाठी २ कोटी रुपये डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी २ कोटी, यंत्र सामुग्रीसाठी १७.५० लाख इतर अनावरचे खर्च ८३ लाख होते. असा एकूण पाच कोटी ८ लाख ३६ हजारांचा खर्च ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी प्रस्तावित केलेला आहे. परंतु लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून एक वर्षापासून हा प्रस्ताव मान्यतेसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला नाही. प्रशासकीय व तांत्रिक बाबीची मान्यता निधी तरतूद याबाबीमुळे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
दुसरीकडे सात वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले ट्रामा केअर युनिट सेंटर धुळखात पडले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी माजी नागोराव इंगोले यांनी केली़
नऊ पदांना दिली होती मंजूरी
मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी ट्रामा युनिट केअर सेंटरला मान्यता मिळाली. त्यासाठी ९ पदांना मंजुरी देण्यात आली. त्यात अस्थीव्यंग, शल्य चिकित्सक-वर्ग-२- १ पद, बधिरीकरण शास्त्रज्ञ वर्ग-२ दोन पदे, वैद्यकीय अधिकारी-२, परिसेविका वर्ग-३ १ पद, अधिपरिचारिक-३ असे एकूण ९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत या पदावरील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटर युनिटला असताना काम मात्र दुस-या दवाखान्यात करत आहेत. एकीकडे पदस्थाना असूनही ट्रामा युनिट केंद्र मात्र बंद अवस्थेत आहे.
सात वर्षापूर्वी मालेगाव येथे ट्रामा युनिट केअर सेंटर उभारण्यात आली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे सदरील ट्रामा सेंटर सुरू होत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे. दप्तर दिरंगाईमुळे तो तसाच पडून आहे. पालकमंत्री यांच्याकडे निधीसाधी मागणी करणार आहे. - नागोराव इंगोले, माजी जि.प. सदस्य, मालेगाव.