माहेरी आलेल्या पत्नीला सोबत न पाठविल्याने जावयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:24 PM2021-04-23T18:24:23+5:302021-04-23T18:26:23+5:30
पत्नीस नांदविण्यासाठी पाठविण्यास नकार देऊन केली मारहाण
नांदेड : पत्नीला सोबत न पाठविल्याच्या रागातून जावयाने आत्महत्या केली. ही घटना २४ मार्च रोजी सायंकाळी कंधार तालुक्यातील नवघरवाडी शिवरात घडली होती. या प्रकरणी कंधार पोलिसांनी अखेर बुधवारी पत्नीसह सासू, सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कंधार तालुक्यातील नरवटवाडी येथील सोपान रामराव नरवटे (२५) यांची पत्नी नांदण्यास तयार नसल्याने माहेरी निघून गेली होती. त्यानंतर सोपान नरवटे हे त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी लोहा तालुक्यातील बोळका येथे गेले होते. मात्र, सासरच्या मंडळीनी त्याच्या पत्नीस नांदविण्यासाठी पाठविण्यास नकार दिला. तसेच सासरा संभाजी सुरनर, सासू सिंधू सुरनर, मेहुणा खंडू सुरनर व पत्नी स्वाती नरवटे यांनी मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने व पत्नी नांदण्यास येत नसल्याने सोपान नरवटे यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी नवघरवाडी शिवरातील गायरान जमिनीवर विष प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येस सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार रामराव नरवटे यांनी कंधार पोलिसांकडे केल्यानंतर मृताची पत्नी, सासू, सासरा व मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गांगलवाड हे करीत आहेत.