सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:47 AM2024-03-05T00:47:40+5:302024-03-05T00:49:40+5:30
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार ४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.
- गोविंद टेकाळे
अर्धापूर : मोठ्या संख्येने मराठे एकत्रित आले आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे सोमवार ४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. दरम्यान, ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोमवार ४ मार्च रोजी विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर रात्री १०.३० वाजता पिंपळगाव महादेव येथे त्यांची सभा झाली. पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचा संघर्ष मोठा आहे. आमच्या जिवापेक्षा आम्हाला समाज मोठा आहे. आरक्षण मिळणार असून सरकारकडून सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून लढा सुरू आहे, करोडो मराठ्यांनी पाठिंबा दिला आहे. आरक्षण मिळाल्यानंतर पहिली सभा पिंपळगाव येथेच होईल, असेही यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित समाज बांधवांना आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. तब्बल चार तास पिंपळगावकरांनी जरांगे पाटील येण्याची वाट पाहिली.