नांदेडातून कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:13 AM2018-11-27T00:13:58+5:302018-11-27T00:17:48+5:30
येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष रणनिती आखणार आहे.
नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा अपयशी ठरला. मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष रणनिती आखणार आहे. विशेषत: नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली टाकत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षाबरोबरच भाजपातील इच्छुकांनाही सूचक इशारा दिला.
पक्षबांधणी तसेच निवडणूकपूर्व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांची सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २८८ विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कल्याणनंतर आता मराठवाड्याचा दौरा करीत असून दुस-या टप्प्यात इतर जिल्ह्यांत जावून कार्यकर्त्यांकडून निवडणूक तयारीची माहिती घेणार आहे. नांदेड जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत पक्षाचे काम वाढले आहे. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यातही असल्याचे सांगत थेट मतदारांपर्यंत जाण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिका-यांनी बाहेर पडावे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.
आगामी निवडणुका शिवसेनेसह समविचारी पक्षांना सोबत घेवून लढण्याचा मानस आहे. शिवसेनेने आता मंदिर उभारण्याची हाक दिली आहे. राम मंदिराच्या मुद्यावर शिवेसना कालही आमच्यासोबत होती आणि आजही आमच्याबरोबरच असल्याचे सांगत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेना-भाजपात काही ठिकाणी संघर्ष होत असला तरी आम्ही एकत्रच असल्याचे सांगत मागील निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले होते. येणा-या निवडणुकीतही पाच-सहा जागा वगळता राज्यभरात जनता भाजपच्याच पाठीशी उभी असल्याचे पुन्हा दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्याने विचार करणार असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीला संघटनमंत्री विजय पुराणिक, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, संतुक हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. गंगाराम ठक्करवाड, बालाजी शिंदे, चैतन्य देशमुख, प्रवीण साले, व्यंकटेश साठे, श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दानवे यांच्या परीक्षेत पदाधिकारी नापास
आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी अनेक पदाधिकाºयांच्या कामावर दानवे हे नाराज दिसून आले. बुथवाईज कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारले गेले नाही, पक्षाच्या विविध आघाड्या, सेलच्या नियुक्त्या अद्यापही झालेल्या नसल्याचे पुढे आल्यानंतर आमदारांसह पदाधिकाºयांचा त्यांनी समाचार घेतला़
जिल्ह्यातील नायगावसह ज्या मतदारसंघात ताकद आहे किमान तिथे तरी जोर लावा, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. नांदेड शहरातील दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात अपेक्षित काम झाले नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मात्र दानवे यांनी नांदेडमध्ये उत्तम काम सुरू असल्याचा दावा केला.
शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
मागील चार वर्षांत कर्जमाफी, आवास योजनासह गॅस, मीटर, कृषी, ठिबक आदी विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने लाखो नागरिकांना विविध लाभ दिलेले आहेत. या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत भाजपा पदाधिकारी पोहोचला पाहिजे, असे सांगत थेट घरोघरी जावून पक्षाच्या ध्येय-धोरणाबरोबर सरकारच्या कामाची माहिती द्या, असे आदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाºयांना दिले. नांदेड जिल्ह्यातील कामाबाबत मी समाधानी नाही, आगामी काळात पुन्हा नांदेडला येवून कामाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.