अनेक वाहनधारक दंडाबाबत अनभिज्ञच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:07+5:302021-08-22T04:22:07+5:30
नांदेड : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना वाहनांना अडविण्याची गरज राहिली नाही. ...
नांदेड : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना वाहनांना अडविण्याची गरज राहिली नाही. आजघडीला प्रत्येकाच्या हातात ई-चलानसाठी मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईलमधील ॲपवर संबधित वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र काढल्यानंतर त्या वाहनधारकाच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज जात आहे.
परंतु अनेकांना वारंवार आपला मोबाईल बदलण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना आपण नियमांचे उल्लंघन केले आणि त्याला दंड ठोठावण्यात आला याचीही माहिती नसते. अशाप्रकारे हजारो रुपयांचा दंड त्या वाहनाच्या नावाने साचतच जातो. त्यामुळे अशा दंडाचे काय, असा प्रश्न आहे. नांदेड शहरातही शहर वाहतूक शाखेने अनेकांना ऑनलाईन दंड ठोठावला आहे. परंतु अनेकांना त्याबाबत माहितीच नाही.
दंडाची थकबाकी वाढली
n शहर वाहतूक शाखेकडून यापूर्वी नियम तोडल्यास लगेच त्या वाहनधारकाला पकडून त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली जात होती. त्यामुळे लगेच ही वसुली होत होती. आता मात्र ई-चालानमुळे संबधित वाहन चालक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दंडाची थकबाकी वाढतच जाते.
आता ऑनलाईनच दंड
नियम तोडत असलेल्या वाहनधारकांच्या विराेधात शहर वाहतूक शाखा कारवाई करते. त्यासाठी ई-चालानचा वापर केला जातो. शहरात वेगवेगळ्या पॉईंटवर अशाप्रकारे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते.- पोनि.चंद्रशेख कदम
शहर वाहतूक शाखेकडे ई चालानसाठी ॲप देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करुन ठेवतात. त्यानंतर रस्त्यावर कोणत्याही वाहनधारकाने नियम तोडल्यास लगेच त्याचे छायाचित्र काढून दंडाचा मेसेज पाठविला जातो.
या मेसेजमध्ये संबधित वाहन चालकाने नो पार्किंग, सिग्नल, भरधाव वेगाने चालविणे, ट्रिपल सीट यापैकी कोणत्या नियमांचा भंग केला. हेही नमूद असते. तसेच दंड नेमका किती आकारला त्याची माहितीही दिली जाते. त्यामुळे वाहनधारकाला आपली चूक कळते.