नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
By शिवराज बिचेवार | Published: April 9, 2024 03:04 PM2024-04-09T15:04:34+5:302024-04-09T15:06:31+5:30
अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.
नांदेड-लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सोमवारी रात्री भोकर तालुक्यातील सभा आटोपल्यानंतर परत जात असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले होते.
यावेळी ताफा जात असताना कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा या घोषणा दिल्या. पोलिस बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे रुप आले होते.मराठा आरक्षणाच्या विषयावरुन जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांच्या सभांना जायचे नाही, कुणाचा प्रचारही करायचा नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचाराला आल्यानंतर त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहेत. काही दिवसापूर्वीच कोंढा गावात अशोकराव चव्हाण यांचे वाहन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरही अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.
सोमवारी रात्री अशोकराव चव्हाण हे भोकर तालुक्यातील रेणापूर येथे प्रचारासाठी गेले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास सभा आटोपून ते भोकरकडे येत असताना बटाळा गावातील मराठा आंदोलक गोळा झाले होते. चव्हाणांचा ताफा अडविण्याचा ते प्रयत्न करणार होते. परंतु पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावर येण्यापूर्वीच अडविले. परंतु त्यानंतरही आंदोलकांनी चव्हाणांचा ताफा जात असताना घोषणाबाजी केली. यावेळी मोठा फौजफाटा बटाळा या गावात तैनात करण्यात आला होता.