नांदेडात मराठा समाजाचे आंदोलन पेटले; सर्वपक्षीय आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:51 PM2018-07-20T13:51:10+5:302018-07-20T13:52:56+5:30
आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडात सर्वपक्षीय आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले़
नांदेड : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने परळीत काढलेल्या ठोक मोर्चानंतर सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडात सर्वपक्षीय आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले़
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, महाभरती रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़ आंदोलकांनी रात्री देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम केला.आज देखील ठिय्या आंदोलन सुरूच असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे़
दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजातील आमदार मराठा आरक्षणावर प्रश्न उपस्थित करीत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळी नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्वपक्षीय मराठा समाजातील आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़