कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

By श्रीनिवास भोसले | Published: January 30, 2024 09:43 AM2024-01-30T09:43:39+5:302024-01-30T09:43:57+5:30

Maratha Reservation:

Maratha Reservation: 57 lakh records of Kunbi; But only 32 thousand in Marathwada | कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

कुणबीच्या ५७ लाख नोंदी; पण मराठवाड्यात ३२ हजारच

-श्रीनिवास भोसले 
नांदेड - राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील जवळपास सर्वच मराठा हे कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या विभागात कुणबी नोंदी आढळणे सर्वश्रुत आहे; परंतु ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली, त्या मराठवाडा विभागात केवळ ३२ हजार ९१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. सर्वाधिक ३५ लाख ५७ हजार ४३५ नोंदी या विदर्भातील असून, तेथील मराठा समाज यापूर्वीच आरक्षणात आहे. 

राज्यात पश्चिम महाराष्ट्र अथवा विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा मागासलेला आहे. येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यापाठोपाठ आरक्षणासाठीदेखील सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना राज्यभर पेटलेल्या मराठा आरक्षणाचे नेतृत्वदेखील मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आहे.

काही गावांत नोंदच नाही
मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याचा जल्लोष गावागावात दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला. मात्र, शासनाने शोधलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाण मराठवाड्यात अत्यल्प आहे. काही गावांत तर एकही नोंद नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त मानले जात आहे. 

‘सगेसोयरे’मध्ये आईकडच्या नात्याचे काय?
- राज्य सरकारने सध्या काढलेल्या अधिसूचनेमध्ये सगेसोयरेच्या अनुषंगाने पितृसत्ताक पद्धतीतून निर्माण झालेल्या नातेवाइकांचा स्वीकार केला जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
- पितृसत्ताक असा उल्लेख केल्याने आईकडून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे आई, मामा अथवा सासरा, मेहुणा अथवा बायको कुणबी असेल तर ते सगेसाेयरे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
- विदर्भ आणि मराठवाड्यातील रोटी-बेटी व्यवहार ग्राह्य धरला जाणार की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Maratha Reservation: 57 lakh records of Kunbi; But only 32 thousand in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.