मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 12:06 PM2022-02-28T12:06:21+5:302022-02-28T12:12:30+5:30
नांदेड जिल्ह्यात मारताळा कापशी परिसरात मुख्य रस्त्यावर जाळपोळ करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
नांदेड : मराठा आरक्षण प्रकरणी शासनाने दिलेली कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे भोसले यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असून राजेंची प्रकृती बिघडल्याने राज्यात आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात नांदेड जिल्ह्यात मारताळा कापशी परिसरात मुख्य रस्त्यावर जाळपोळ करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी कोणतरी रस्त्यावर उतरत आहे. त्याला पाठबळ दिले पाहिजे या भावनेतून लोक त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार संभाजीराजे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोमवारी (दि २८) चर्चा करणार आहेत.
गरीब मराठ्यांसाठी माझा लढा
महाराष्ट्रात २००७ पासून फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे, याबाबत जनजागृती केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात, १२ बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे, असे खासदार संभाजीराजे उपोषणा मागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले.