‘मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकली पाहिजे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:49 PM2019-04-02T23:49:39+5:302019-04-02T23:50:45+5:30
जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे
नांदेड : जगातील अनेक प्रगत देशांत इंग्रजीतून नव्हे, तर त्यांच्या मातृभाषेतूनच उच्च शिक्षण दिले जाते. ही बाब लक्षात घेता आपल्याकडेही मराठीतूनच दर्जेदार अध्यापन झाले पाहिजे तरच मराठी ही ज्ञानभाषा म्हणून टिकेल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.
ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय कार्यालय लातूरच्या वतीने पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित ‘मराठी भाषेचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात बोलत होते. कुलगुरु डॉ. वाघमारे म्हणाले, जागतिकीकरणामुळे स्थानिक भाषांचा होत असलेला लोप आणि मराठी भाषकांची उदासीनता याबद्दल चिंता व्यक्त करुन वाढत्या स्थलांतरामुळे आपण आपल्या भाषेपासून तुटत चाललो आहोत, ही बाब निदर्शनास आणून दिली.
यावेळी परिसंवादात प्रा. डॉ. अनंत राऊत आणि प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. श्यामल पत्की, प्राचार्य आर.एम. जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी तर आभार प्रा. कल्पना जाधव यांनी मानले.