मराठवाड्यात २७ गावांतील हरभरा पिकांवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव; विक्रमी पेरणीनंतर नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:38 PM2018-01-20T15:38:39+5:302018-01-20T15:42:28+5:30
हरभर्यातून घसघसीत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असतानाच या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांची चिंंता वाढली आहे. मराठवाड्यातील २७ गावांतील हरभरा सध्या या आजाराने घेरला आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड : रबी हंगामात यंदा तृणधान्य आणि गहू, मक्याऐवजी शेतकर्यांनी हरभर्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील हरभर्याचे सरासरी क्षेत्र यंदा दुप्पटीने वाढले. सध्या हरभरा पिक घाटे भरणे ते पक्वतेच्या मार्गावर आहे. हरभर्यातून घसघसीत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असतानाच या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांची चिंंता वाढली आहे. मराठवाड्यातील २७ गावांतील हरभरा सध्या या आजाराने घेरला आहे.
रबी हंगामात मराठवाड्यातील शेतकरी ज्वारीसह गहू, मका आणि इतर कडधान्यांना प्राधान्य देत आला आहे. मात्र मागील काही वर्षांत रबी ज्वारीसह गव्हाचे क्षेत्र कमी झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात रबी ज्वारीचे २०३०१५० हेक्टर एवढे सरासरी क्षेत्र आहे. मात्र यंदा सरासरी क्षेत्राच्या ६५ टक्के ज्वारीचा पेरा झाला असून हे क्षेत्र १७१५२८८ हेक्टरवर आला आहे. गव्हाची परिस्थितीही अशीच आहे. मराठवाड्यात गव्हाचे १०१३०४० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र यंदा सरासरीच्या ८३ टक्के म्हणजेच ८४०१६७ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला आहे.करडई, जवस, तीळ, सूर्यफुलासह रबी तेलबियाचा पेराही कमालीचा घटला आहे. सरासरी क्षेत्राच्या केवळ २७ टक्के करडई, ३८ टक्के जवस, ५२ टक्के तीळ, ४८ टक्के तेलबिया तर सूर्यफुलाची सरासरी क्षेत्राच्या अवघी १० टक्के पेरणी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत झाली आहे. या पिकांऐवजी मराठवाड्यातील शेतकर्यांनी यंदा दुहेरी उत्पन्न देणार्या हरभर्याला प्राधान्य दिले.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत हरभर्याचे एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख ४४ हजार ६३५ हेक्टर असताना यंदा दुप्पट क्षेत्रांवर म्हणजेच ८ लाख ९० हजार १८९ हेक्टर क्षेत्रावर हरभर्याचा विक्रमी पेरा झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या १४० टक्के, जालना २४२ टक्के, बीड २२८ टक्के, लातूर २७० टक्के, उस्मानाबाद २०१ टक्के, नांदेड १९६ टक्के, परभणी १९३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात हरभर्याचा पेरा सरासरीच्या १२६ टक्के एवढा झाला आहे.
या २७ गावांतील हरभर्यावर प्रादुर्भाव
सद्य:स्थितीत हरभरा पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र हरभर्यावर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अनुक्रमे विडोली (बु), शेंद्रा, रुईभर आणि टाकळी गावातील हरभर्यावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. बीड जिल्ह्यातील ४, परभणी जिल्ह्यातील ९ आणि नांदेड जिल्ह्यातील ११ गावांतील हरभराही ‘मर’ रोगाच्या कचाट्यात सापडला आहे. दरम्यान, कीडरोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांच्या गाव बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तापमान वाढल्याने रोगाचा प्रादुर्भाव
मराठवाड्यात हरभर्याचा यंदा विक्रमी पेरा झाला आहे. थंडीमुळे पिकेही जोमात आली आहेत. मात्र तापमान वाढू लागल्यानंतर अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. सध्या हेलिकोव्हर्पा, घाटे अळी व ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकर्यांनी वेळीच क्लोरोफाईडसह इतर औषधांची फवारणी केल्यास नुकसान टाळता येईल. काही जण आताही हरभरा पेरण्याच्या तयारीत आहेत. मात्र पेरणीची वेळ गेलेली असल्याने शेतकर्यांनी आता हरभर्याचा पेरा घेऊ नये.
- यू. एन. अळसे (विस्तार कृषी विद्यावेता, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी)