मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:45 PM2019-04-02T23:45:16+5:302019-04-02T23:46:18+5:30
अराजकीय संघटना असलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेने मंगळवारी मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला़
नांदेड : अराजकीय संघटना असलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेने मंगळवारी मराठवाडा विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केला़ हा जाहीरनामा लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांसमोर मांडण्यात येणार आहे़ अशी माहिती अध्यक्ष डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी दिली़
मराठवाड्यात उद्योगवाढीसाठी धोरण असले पाहिजे़ हिंगोलीला ‘ना उद्योग जिल्हा’ म्हणून जाहीर केले़ पुणे,मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथे उद्योगांचे केंद्रीकरण करण्याऐवजी दूरस्थ ठिकाणी रेल्वे, रस्ते, विमानतळ आदी वाहतुकीच्या सोयी वाढवून उद्योगांना आकर्षित करावे, नवीन उद्योग सुरु करण्याचे धोरण मागास भागाला समोर ठेवून करण्यात यावे़, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याला जोडणारे चौपदरी रस्ते प्राधान्यक्रमाने तयार करावेत़
औरंगाबाद शहराचे सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मुंबई, हैदराबादला जोडणाऱ्या सुपरफास्ट गाड्या देण्यात याव्यात. औरंगाबादला विभागीय विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी़ सोलापूर-जळगाव तसेच औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पाण्याची सोय व्हावी, जायकवाडी कालवा दुरुस्त करुन शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी़, टेक्सटाईल पार्क व अन्य उद्योग प्राधान्यक्रमाने सुरु करावेत, पैनगंगा व कयाधूचे पाणी जिल्ह्यातील शेतीसाठी मिळावे, नांदेडला आयुक्तालय सुरु करावे़, लेंडी धरण पूर्ण करावे, कृष्णूरसकट इतर एमआयडीसीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, लातूरला कायमस्वरुपी योजना देवून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा़ यासह इतर जिल्ह्यांतील मागण्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे़
यावेळी डॉ़ व्यंकटेश काब्दे, इंजि़ द़ मा़ रेड्डी, सदाशिव पाटील, सोपानराव मारकवाड, शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, डॉ़ डी़ यू़ गवई, प्रा़ डॉ़लक्ष्मण शिंदे, निर्मला पाटील, प्रा़ डॉ़भोवरे, एस़ डी़ बिलोलीकर, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, चंद्रकांत जटाळ, गोविंदराव सिंधीकर यांची उपस्थिती होती़