मराठवाड्यात यंदा कोकणाहून अधिक पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:49+5:302021-02-05T06:08:49+5:30
नांदेड : पावसाच्या दगाफटक्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीतच दुष्काळ मराठवाड्याच्या वेशीवर येऊन उभा राहिलेला असतो. त्यामुळे दरवर्षी या विभागातील मोठ्या भागाला पिण्याच्या ...
नांदेड : पावसाच्या दगाफटक्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीतच दुष्काळ मराठवाड्याच्या वेशीवर येऊन उभा राहिलेला असतो. त्यामुळे दरवर्षी या विभागातील मोठ्या भागाला पिण्याच्या पाण्यासाठी रोजचे युद्ध लढावे लागायचे. मात्रए मागील दोन वर्षांत वरुणराजाने मराठवाड्यावर कृपादृष्टी दाखविल्याने यंदा राज्यात मोठ्या धरणात सर्वाधिक म्हणजे ८१.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा मराठवाड्यात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात टँकरसाठी रांगा लागलेल्या दिसायच्या. मात्रए यंदा या विभागात एकाही टँकरची अद्यापपर्यंत गरज भासलेली नाही.
मागील दोन पावसाळे मराठवाड्यासाठी मोठा दिलासा देणारे ठरले. २०१९ च्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने या भागातील धरणे तुडुंब भरली. तर २०२० मध्ये अगदी जूनपासूनच सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद झाली. त्यामुळेच मागील दोन वर्षांत मराठवाड्यासाठी उन्हाळा सुसह्य झाल्याचे चित्र आहे.
पुरेशा पावसाअभावी मराठवाड्याला नेहमीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. २०१८ मध्ये तर डिसेंबर महिन्यातच २२ लाखाहून अधिक नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली होती. तीच परिस्थिती २०१९ मध्ये होती. या वर्षातील फेब्रुवारीतच मराठवाड्यातच १३८७ टँकरद्वारे २५ लाखावर नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदा मात्र पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्याने या भागाला टंचाईची तीव्रता जाणवणार नाही असे चित्र आहे.
३ फेब्रुवारी रोजी बुधवारी राज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२१५८.७६ दलघमी म्हणजेच ७६.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती विभागात ७७.७१ टक्के, नागपूर विभागात ६८.५६ टक्के, नाशिक विभागात ८०.९९ टक्के, पुणे विभागात ७६.६३ टक्के, कोकण विभागात ७०.०५ टक्के तर औरंगाबाद विभागात सर्वाधिक म्हणजे ८१.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अशीच परिस्थिती राज्यातील २५८ मध्यम प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पात ८१.२९ टक्के पाणी उपलब्ध आहे. कोकण विभागातील सात प्रकल्पात ८१.७२ टक्के, नागपूर विभागातील ४२ प्रकल्पात ४७.८५, नाशिक विभागातील ५३ प्रकल्पात ७७.३६ टक्के, पुणे विभागातील ५० प्रकल्पात ७४.२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पात ७५.५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
चौकट..........
सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला दिलासा
२०१७ मध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. २०१८ मध्ये याच आठवड्यात मराठवाड्यात तब्बल ११३ टँकर सुरू होते. मात्र, मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये पाणी पुरवठ्यासाठी एकही टँकर फेब्रुवारीत लागला नव्हता. हीच परिस्थिती यंदा सलग दुसऱ्या वर्षी असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील एकाही जिल्ह्याला सध्या पाणी टँकरची गरज भासलेली नाही.
चौकट......
कोरडेठाक असलेल्या सिना-कोळेगाव, मांजरात यंदा मुबलक पाणी
मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पात यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात यंदा ८८.०४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षी कोरडेठाक पडलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सिना-कोळेगाव प्रकल्पातही ७३.९१ टक्के पाणीसाठा बुधवारी उपलब्ध होता.