विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:27+5:302021-05-10T04:17:27+5:30
गायी चोरणाऱ्या टोळीस पकडले नायगाव : तालुक्यातील मांजरमवाडी येथील मोकाट गायी टेम्पोमध्ये डांबून चोरून नेणाऱ्या आराेपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ...
गायी चोरणाऱ्या टोळीस पकडले
नायगाव : तालुक्यातील मांजरमवाडी येथील मोकाट गायी टेम्पोमध्ये डांबून चोरून नेणाऱ्या आराेपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ६ मे रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी टेम्पो व दुचाकी असा एकूण ३ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त केला. गावातील कसाई इसाक अब्दुल कुरेशी, बाबू अब्दुल कुरेशी, अहमद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. मांजरमचे जमादार शेख तपास करीत आहेत.
दुचाकीची चोरी
देगलूर : शहरातील अहमदीया कॉलनी येथील एक दुचाकी चोरट्यांनी ४ मे रोजी लंपास केली. नरंगल रोड येथील अहमद रसुल मिया कुरेशी यांनी दुचाकी उभी करून ठेवली असता चोरट्यांनी ती लांबविली. देगलूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
राजेश पवार यांची भेट
उमरी : येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या दोन बहिणींची आ. राजेश पवार यांनी भेट घेऊन माहिती घेतली. त्यांना धीर दिला. रेखा व राधा पैनेवार अशी उपोषणकर्त्या बहिणींची नावे आहेत. गेले पाच दिवसांपासून त्या उपोषणाला बसल्या आहेत. तहसीलदार माधव बोथीकर यांना उपोषणकर्त्या बहिणींना न्याय देण्याची सूचना केली. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले.
दोन महिन्यांत रस्ते उखडले
हिमायतनगर : तालुक्यातील खैरगाव (ज.) ग्रामपंचायत अंतर्गत खैरगाव तांडा, गोदनतांडा, नाईक तांड्यात ३० लाख रुपये खर्चून सिमेंट रस्ते तयार करण्यात आले होते. सिमेंट रस्ते अवघ्या दोन महिन्यांत उखडले. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने देण्यात आला.
पिंपळगाव येथे रक्तदान शिबिर
हिमायतनगर : पिंपळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात २७ जणांनी रक्तदान केले. संतोष पाटील साखरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जि. प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी उपसरपंच माधव राठोड, सदस्य फारूख शेख, राम महाजन, राम मुलंगे, सोनू पालकृतवार, आदी उपस्थित होते. शिबिरासाठी अभिजित पाटील, धरमुरे, अमोल पाटील, गणेश गुरुपवार, मंगनाळीकर, दत्तात्रय पाटील यांनी परिश्रम घेतले.
नारायण शिंदे यांची निवड
भोकर : महाराष्ट्र एनजीओ समितीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नारायण शिंदे यांची निवड झाली. संघटनेची झूम ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी राज्याचे अध्यक्ष युवराज येडुरे, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मी भारती, सचिव सचिन यादव, संपर्कप्रमुख संदीप पोटे, सदस्य डॉ. प्रियदर्शनी चौरंगे, उषा देसाई, अमोल गोरे यांची उपस्थिती होती.
रुग्णवाहिकेचा प्रारंभ
भोकर : येथील ग्रामीण रुग्णालयासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा प्रारंभ शनिवारी (दि.८) करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मुंडे, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष एन. ए. रज्जाक, डॉ. माधव विभूते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज पांचाळ, वैशाली कुलकर्णी, मंदा चव्हाण, राजश्री बामणे, पांडुरंग तमलवाड, आदी उपस्थित होते. यावेळी चालक विजय गायकवाड, सोहेल यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली.
वादळी वाऱ्याने नुकसान
हदगाव : तालुक्यात चार दिवसांपासून वादळी वारे व पावसाने मोठे नुकसान होत आहे. हदगाव तालुक्यात केळीचे पीक जोरदार आले. परंतु, पावसामुळे मोठे नुकसान झाले. वाऱ्याने केळीची पाने पूर्णत: फाटली असून, काही झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे केळीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
संतोष वच्चेवार पदकाने सन्मानित
धर्माबाद : येथील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष वच्चेवार यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे, सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश कत्ते, पोलीस उपनिरीक्षक कराड, जमादार शेषराव कदम, आदींनी वच्चेवार यांचे स्वागत केले.
सरकारचा निषेध
नायगाव : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. राज्य व केंद्र शासनच याला जबाबदार असल्याचा आरोप करून मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी पांडुरंग पाटील, गंगाधर पाटील, यादव पाटील, हणुमंत पाटील, प्रताप पाटील सोमठाणकर, गंगाधर पाटील, कल्याण पाटील, सुमीत पाटील, बालाजी पाटील, साईनाथ पाटील, नवनाथ पाटील, सुनील पाटील, अविनाश पाटील, आदी उपस्थित होते.
दहेगावमध्ये सागवान लंपास
किनवट : तालुक्यातील दहेगाव येथे शेतातून २५ हजार रुपये किमतीचे सागवान अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना ५ मे रोजी घडली. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या शेतात ही घटना घडली. किनवट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, जमादार पांढरे तपास करीत आहेत.
३६ तास वीज गूल
बिलोली : बिलोली तालुक्यातील थडीसावळी येथे सुमारे ३६ तासांनंतर वीज आली. पाऊस, पाण्यामुळे वीज खंडित झाली होती. थडीसावळी येथून आळंदी फिडरच्या नावाने अनेकगावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, आजपर्यंत सुरळीत वीजपुरवठा कधीच झालेला नाही. दिवस-रात्र मिळून १० ते १२ तास वीज गायब हाेत असते. महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
सुरक्षा कीटचे वाटप
हदगाव :- दिल्ली येथील व्हिजन स्प्रींग फाऊंडेशन व माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी, आदींना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा आष्टीकर, तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, संजय पवार, रमेश घंटलवार, राहुल भोळे, नीलेश पवार, अमोल आडे, नगरसेवक शिवा चंदेल, बाळा माळोदे, दीपक मुधोळकर, माेतीराम वानखेडे, अतुल भोळे, अभिषेक चंदेल, आदी उपस्थित होते.