विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:10+5:302021-03-25T04:18:10+5:30
सिडको एनडी-४, रामनगर येथील रहिवासी तथा ट्रकचालक गुणाजी जयराम कोल्हे याने चार महिन्यापूर्वी कुंडलवाडी येथील ट्रक चालक पोशेट्टी ...
सिडको एनडी-४, रामनगर येथील रहिवासी तथा ट्रकचालक गुणाजी जयराम कोल्हे याने चार महिन्यापूर्वी कुंडलवाडी येथील ट्रक चालक पोशेट्टी पी. विठ्ठल यांच्याकडून ट्रक विकत घेतला. उपरोल्लेखित ट्रक खरेदी-विक्रीचा व्यवहार हा गुणाजी कोल्हे व पी. पोशेट्टी या दोघांमध्येच झाला असल्यामुळे या ट्रकच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची माहिती ट्रक चालक कोल्हे यांच्या पत्नीला नव्हती. दरम्यान, कुंडलवाडी येथील पी. पोशेट्टी हे २३ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान ट्रकचे पैसे मागण्यासाठी कोल्हे यांच्या घरी आले, तेव्हा आपल्या पतीने ट्रक विकत घेतला असल्याची माहिती कोल्हे यांच्या पत्नीस समजली. याशिवाय पोशेट्टी हे गत एक महिन्यापासून अधूनमधून पैसे मागण्याकरिता घरी येत असल्याने कोल्हे यांच्या पत्नीने ट्रक मालक पोशेट्टी यांना तुमच्या ट्रक खरेदी-विक्रीचा व्यवहार हा तुमच्या दोघांमध्येच झाला आहे, त्यामुळे तुम्ही पैसे गुणाजी कोल्हे यांना मागा, असे म्हणाले. त्याचवेळी पोशेट्टी यांनी आपणास तू तुझ्या पतीला घरामध्ये लपविले आहे, मला पाहायचे आहे म्हणून घरात सर्वत्र पाहिले. मात्र, पती घरात आढळून आले नसल्याने आरोपी पोशेट्टी याने चिडून आपल्याला शिवीगाळ केली. आरोपी पोशेट्टी हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपला हात धरून ओढून विनयभंग केला. याशिवाय त्याने आपल्या मुलासही थापड-बुक्क्यांनी मारहाण करून आपणास जीवे मारण्याचीही धमकी दिली आहे, असा आरोप पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि डी.एन. मोरे व मदतनीस पो.कॉ. रेवणनाथ कोरनुळे यांनी दिली. ग्रामीण ठाण्यात अखेर आरोपी पोशेट्टी विठ्ठल बाशेट्टी (रा. कुंडलवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आनंद बिचेवार व नाईक पो.कॉ. महिंद्र कौठेकर हे तपास करीत आहेत.