गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 08:05 PM2021-10-07T20:05:22+5:302021-10-07T20:07:19+5:30
कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले.
- श्रीनिवास भोसले
नांदेड : एमपीएससी परीक्षेनंतर देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसविल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर आता नीट, जेईई-मेन्स, जेईई ॲडव्हान्सच्या ‘गुणवंतां’ची रोख पैशासह सोन्याचे बिस्कीट अन् गाडी अशा स्वरूपाचे आमिष देऊन पळवापळवी केली जात आहे. परंतु, अशाप्रकारे शिक्षण अन् गुणवत्तेचा बाजार मांडणाऱ्यांना नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे.
कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले. त्यामुळेच पूर्वी नीट, जेईई परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचा कल राजस्थानमधील कोट्याकडे असायचा. परंतु, नांदेडसह लातूरमधील कोचिंगच्या गुणवत्तेमुळे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील विद्यार्थीही मराठवाड्याकडे भविष्याची आशा म्हणून पाहत आहेत. परंतु, काही कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थी पळवापळवीच्या धोरणामुळे नामुष्कीची वेळ ओढवत आहे. गतवर्षी विदर्भातील एका विद्यार्थिनीने तीन कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीमध्ये आपले फोटो दिले. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. असे अनेक प्रकार स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्यासाठी आणि देशात आपणच कसे टॉप आहोत, हे दाखविण्यासाठी कोटा, हैदराबाद, दिल्लीच्या कोचिंग क्लासेसकडून केले जायचे. त्यात आता लातूर, नांदेडस्थित काही क्लासेसनी उडी घेतली आहे.
१२ सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा झाली आहे. यंदा फिजिक्स विषयामुळे मेरिट घसरणार असल्याची धास्ती विद्यार्थ्यांसह क्लासेस संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे काही क्लासेसने निकालापूर्वीच टॉप विद्यार्थ्यांना हेरण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी खास लोकांची टीम कामाला लावली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत आहेत, अथवा राज्यात, देशात टॉप येईल, असा अंदाज घेतला जात आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नजीकचे नातेवाईक, पालकांपर्यंत पोहोचून त्यांना गुणवत्तेच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तुम्हाला सोन्याचे बिस्कीट, अंगठी, दुचाकी गाडी अथवा रोख रक्कम देण्याची भुरळ पालकांना घातली जात आहे. त्या बदल्यात केवळ तुमचा विद्यार्थी आमच्याकडे शिकल्याचा दावा तुम्हाला करायचा आहे, असे सांगण्यात येत आहे. हा प्रकार करणाऱ्या क्लास संचालकांसह पालक आणि विद्यार्थ्यांवरही चार-सहा महिन्यांनी नामुष्कीची वेळ येते. परंतु, काही पालक, विद्यार्थी संबंधित क्लासेसच्या जाहिराती पाहून भुलतात अन् तिथे प्रवेश घेतात. एकप्रकारे गुणवंतांनी दिलेल्या होकारामुळेच भविष्यातील गुणवंतांचे नुकसान होत आहे.
पालक-विद्यार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये
आपण ज्यांच्याकडे शिकलो, ज्यांनी आपल्यासाठी मेहनत घेतली, त्याच गुरूंना आपण आपल्या यशाचे श्रेय द्यावे, असे संस्कार पालकांकडून मुलांना दिले जायचे. परंतु, काही पालक आपल्या पाल्याच्या गुणवत्तेचा बाजार करीत आहेत. शिक्षण एकाकडे अन् जाहिरात दुसऱ्याकडे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांसह संबंधित क्लास संचालकांसह शिक्षण क्षेत्राचीही बदनामी होते. त्यामुळे अशा भूलथापा अन् आमिषाला पालक, विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन शिक्षणप्रेमींकडून केले जात आहे.